अमरावती - जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी शहरातील आलम चौकात वीज चोरी पकडण्यास गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा मोबाईल हिसकावून वीज चोरीचा व्हिडिओ व फोटो डिलीट करून अभियंत्यास मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात असून शहरात या घटनेने खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी (दि. 22 मार्च) दुपारच्यासुमारास अंजनगावसुर्जी विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एक पथक वीज बिलाची वसुली करत असताना संबंधित पथकाला आलम चौक येथील वाजीदखान रीयाज्जुल्ला खान याने घरातील मीटरमधून डायरेक्ट पद्धतीने वायर टाकून चोरी करत असल्याचे निदर्शनास आले. सहायक अभियंता संदीप गुजर व त्याच्या सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनी विद्युत चोरीत मोडत असल्याने वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटना स्थळावरील फोटो व व्हिडिओ काढला असता आरोपी वजीदखान रियाज्जुला खानसह इतर चार जणांनी सहायक अभियंता गुजर व कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. निलेश बर्वे या सहकारी कर्मचाऱ्यांचा मोबाइल हिसकावून काढलेले व्हिडिओ व फोटो जबरदस्तीने डिलीट केले.
पोलिसात तक्रार
या घटनेमुळे वीज वितरण कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून थेट पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर या प्रकरणाची तक्रार सहायक अभियंता संदीप गुजर यांनी अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात दिली. वीज वितरण कंपनीच्या सहायक अभियंत्याच्या तक्रारीवरुन आरोपी रियाजुल्ला व इतर चार अनोळखी व्यक्तींवर भा.द.वि. 353, 323, 504, 506 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधितांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - राष्ट्रवादीच्या जीवावर खासदार झालेल्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा मारू नयेत - रुपाली चाकणकर