अमरावती - जिल्ह्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणावर युरिया खताचा तुटवडा होत आहे. याचा फटका चिखलदरा तालुक्यालाही बसला आहे. आदिवासी शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. कृषी सेवा केंद्रात शेतकऱ्यांना एकच बॅग युरिया मिळत असल्याने शेतीला मग कुठले खत टाकावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ मुबलक युरिया उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, शेतीची कामे टाकून युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांना रांगेत उभे राहावे लागत आहे.
चिखलदरा तालुक्यातील चूरणी या गावात एकच कृषी सेवा केंद्र आहे. त्यामुळे परिसरातील हजारो शेतकरी याच कृषी केंद्रातून खत खरेदी करत असत. यावर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मका या पिकाची लागवड केली आहे. सध्या पिकाला खतांची गरज आहे. डीएपीसारखे महागडे खत शेतकरी टाकू शकत नसल्याने शेतकऱ्यांकडून युरियाला मागणी असते. परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणात युरियाचा तुटवडा असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.