अमरावती - शहरालगत मालखेड-पोहरा, वडाळी आणि चिरोडीचे समृद्ध जंगल आहे. या घनदाट जंगलात वाघांसह बिबट्या, लांडगे, चितळ, हरीण, रोही, रानडुक्कर असे अनेक प्राणी आणि विविध प्रकारचे पक्षी आढळतात. मोर हा पक्षी याठिकाणचे आकर्षण आहे. मात्र दिवसेंदिवस इथल्या मोरांची संख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी याविषयी चिंता व्यक्त केली आहे.
अमरावती-चांदूर रेल्वे मार्गावरील राज्य राखीव पोलीस दल वसाहतीचा परिसर संपताच वीजेचे टॉवर आहेत. याठिकाणी 15 दिवसांपुर्वी पहाटे 7 ते 8 मोर दिसायचे. तसेच अनेकदा या भागात मोरांचे थवे उडताना आणि बागडताना दिसायचे. या भागात सकाळी फिरायला येणाऱ्यांसाठी मोराचे दर्शन ही पर्वणी असायची. जंगलात मोठ्या संख्येने असणारे मोर मागील 15-20 दिवसांपासून अगदी नाहीसे झाले आहेत. जंगलातून येणारा मोरांचा आवाज बंद झाला आहे.
शिकार झाल्याचा संशय..
या जंगलात काही दिवसांपासून 20-25 वर्ष वयोगटातील 7-8 युवकांचे टोळके रानडुकरांची शिकार करून मृत जनावरांना दुचाकीवरून नेताना आढळून आले. रानडुकरांसोबतच हे टोळके मोरांचीही शिकार करीत असावे, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. विशेष म्हणजे काही नागरिकांनी याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. मात्र वन विभागाच्या कुठल्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने या विषयाला गांभीर्याने घेतले नाही.
जंगलात गस्त घालणे आवश्यक..
महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे यांच्याकडे काही नागरिकांनी तक्रार केली असता, त्यांनी या दाट जंगलात भ्रमंती करून वास्तविकता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अचानक मोरांची संख्या कमी होणे ही गंभीर बाब असल्याचे यादव तरटे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले. जंगलात बिबट्या, लांडगे असे इतर बरेच प्राणी आणि पक्षी असल्याने वन विभागने या जंगलाकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच जंगलात गस्त आवश्यक असल्याचे देखील तरटे म्हणाले.
बिबट्यांचे प्रमाण वाढले, मात्र शिकारीही वाढल्या..
गेल्या दहा वर्षात घनदाट झालेल्या या जंगलात बिबट्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले असून 30हून अधिक बिबटे या जंगलात आहेत. जंगल परिसरात दररोज फिरायला येणारे विनोद राऊत यांनी देखील मोर आणि हरीण दिसेनासे होत असल्याचे सांगितले. तसेच जंगलात शिकारीचे प्रमाणही वाढले असल्याचीही त्यांनी माहिती दिली.