अमरावती - यापूर्वी तुम्ही पुणे, मुंबई, कोल्हापूरच्या सरपंच, आमदार, खासदार, राक्षस या जेवणाच्या थाळ्यांची नावे एकलीच असतील. पण, आज आम्ही तुम्हाला दोन अशा राजकारणातील पॉवरफुल नेत्यांच्या नावाने तयार पोटभर जेवणाच्या थाळ्या दाखवणार आहोत. त्या थाळ्या पाहून तुमच्या तोंडालाही पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. आता ही थाळी मुंबई, पुण्यात नाही तर चक्क विदर्भातील अमरावती शहरात आहे. नेमकी ही थाळी आहे तरी कशी आणि कुणाच्या नावाने आहे हे पाहण्यासाठी आपण जाऊया अमरावतीच्या हिरेटेज किचन या हॉटेलमध्ये.
अमरावतीकरांना पवार (नॉनव्हेज), फडणवीस (व्हेज) थाळीचा लागलाय नाद.. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ही दोन्ही नावे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात एकदम पॉवरफुल. या दोन नावांची आता अमरावतीत वेगळ्याच कारणासाठी चर्चा रंगू लागली आहे. या दोघांच्या नावाच्या जेवणाच्या थाळ्या सुरू झाल्या आहेत. आता पवार आणि फडवणीस यांच्या नावाने थाळी म्हटल्यावर ती पॉवरफुल असणारच. अमरावतीमधील प्रसिद्ध हेरिटेज किचन या हॉटेलने एक नवा उपक्रम सुरू केला आहे. ज्यात ६०० रुपयात 'पवार नॉनव्हेज थाळी' तर ४०० रुपयात 'फडणवीस व्हेज थाळी' मिळते.आता ६०० रुपयात पवार थाळी म्हटल्यावर तुम्हालाही प्रश्न पडला असेल नेमके यात पदार्थ आहेत तरी काय? तुम्ही त्याची बिलकूल चिंता करू नका. पवार नॉनव्हेज थाळीमध्ये मटण, चिकन, अंडाकरी, फिशसह, एक चिकन बिर्याणी, अनलिमिटेड तंदुरी रोटी मिळेल आणि एवढंच नाही तर वरून स्वीट, आईस्क्रीम सुद्धा दिले जाते. हे झाले पवार थाळीचे. मग यात आपल्या विदर्भातील फडणवीसांच्या नावाची व्हेज थाळी कुठे मागे राहणार? या थाळीत तीन भाज्या, दालफ्राय, एक स्वीट, आईस्क्रीम, व्हेज बिर्याणी, अनलिमिटेड रोटी मिळते. पण, आता यात एक अट आहे ती म्हणजे एकट्या व्यक्तीला ही थाळी मिळणार नाही. कारण एकटा माणूस ही खाऊच शकत नाही. अन्न वाय जाऊ नये म्हणून ही थाळी दोघांना संपवावी लागणार आहे. कारण अन्न हे पूर्णब्रह्म म्हटले जाते. आता सहाशे रुपयात थाळी म्हटल्यावर खवय्ये गर्दी करत आहेत.
हेही वाचा - गुरुकुंज मोझरीत तुकडोजी महाराजांच्या समाधी समोर भाजपचे आंदोलन, मंदिरे उघडण्याची मागणी
पुणे, मुंबई, औरंगाबादनंतर अमरावतीमध्ये सुरू झालेल्या या थाळीच्या उपक्रमाला खवय्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. दोन्ही पॉवरफुल थाळ्यांमध्ये पोटभर जेवण मिळत असल्याचे समाधान ग्राहकांनी व्यक्त केले. जसा कोल्हापूरचा झणझणीत तांबडा-पांढरा रस्सा असतो. तसाच विदर्भाचे वऱ्हाडी जेवण हीच बाब या हॉटेल मालकांनी हेरली आणि त्यातून हा उपक्रम सुरू झाला. आता अनलॉक प्रक्रिया सुरू असल्यामुळे त्यामुळे तुमचा बाहेर जाऊन खुमखीत जेवायचं बेत असेल. त्यात वऱ्हाडी जेवनासाठी जीभ आग्रह करत असेल जर तर मग पवार फडवणीच्या थाळीला एकदा चाखून पाहायला हरकत नाही.