अमरावती - तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी या गावातील शंकर नामदेव राघोर्ते या ४८ वर्षीय रुग्णाचा सोमवारी अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शंकर यांचा मृत्यू शिरजगाव येथील एका खाजगी डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे झाल्याचा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी मृतदेह स्मशानभूमीत ठेवला आणि त्या डॉक्टर विरोधात तिवसा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
शिरजगाव मोझरी येथील रहिवासी शंकर नामदेव राघोर्ते यांना १८ तारखेला सर्दी व ताप आला. तेव्हा त्यांनी गावातील एस. के. बिश्वास या खाजगी डॉक्टरकडे उपचार घेतले. दरम्यान सोमवारी जास्त त्रास झाल्याने त्यांना अमरावतीच्या पंजाबराव रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी या रुग्णावर प्राथमिक उपचार करणारे डॉक्टर एस. के. बिश्वास हे सुद्धा सोबत होते. डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी करताच रुग्णाला तात्काळ नागपूर येथे हलविण्यात सांगितले. पण काही वेळातच शंकर यांचा मृत्यू झाला.
यानंतर डॉक्टर बिश्वास यांच्या चुकीच्या उपचार पद्धतीने शंकर यांच्या मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला. नातेवाईकांनी मृतदेह काही काळ स्मशानभूमीमध्ये ठेऊन ठिय्या धरला. काही वेळाने त्यांनी तिवसा पोलीस स्टेशन गाठत डॉक्टर बिश्वास यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. चौकशीत बिश्वास दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, शंकर यांच्यावर मी योग्य उपचार केले. पण त्यांचा त्रास वाढल्याने आम्ही त्यांना अमरावती येथे उपचारासाठी घेऊन गेलो. पण तिथे त्यांचा मृत्यू झाला. मी चुकीचे उपचार केले नाही, अशी माहिती डॉक्टर बिश्वास यांनी दिली.
हेही वाचा - अमरावतीत रंगला ट्विटर वॉर; भाजप नेते बोंडेंची मंत्री यशोमती ठाकुरांवर टीका
हेही वाचा - जानेवारी महिन्यात शाळा सुरू होण्याची शक्यता; शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचे संकेत