अमरावती - विदर्भात उन्हाचा पारा ( Temperature Increase In Vidarbha ) चांगलाच चढला असून सकाळी दहा वाजल्यापासूनच अमरावतीकरांना उन्हाचे चटके बसायला लागले आहेत. या उन्हात घराबाहेर निघणे, हे मोठे आव्हान झाले असताना अशा या कडाक्याच्या उन्हात शहरातील सर्वात मोठ्या राजकमल चौक ( Rajkamal Traffic Signal Green Net ) येथे ट्राफिक सिग्नलवर थांबणाऱ्या वाहनचालकांना सावली मिळावी, या उद्देशाने अंबापेठ प्रभागातील भाजपचे नगरसेवक अजय सारसकर ( Ajay Saraskar ) यांनी चौकात दोन्ही बाजूला ग्रीन नेट लावली आहे. विशेष म्हणजे सहा वर्षापासून त्यांचा हा अभिनव उपक्रम अमरावतीकरांना काही क्षणासाठी का होईना मात्र भर उन्हात दिलासा देणारा आहे.
वाहनचालकांना ग्रीन नेटचा आधार - अमरावती शहरातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या मार्गावरून उड्डाणपूल गेला आहे. या उड्डाणपुलामुळे गाडगे नगर परिसर तसेच इर्विन चौकापासून पुढे राजापेठ चौक आणि राजापेठ चौकापासून बडनेरा मार्गाच्या दिशेने श्री समर्थ शाळेपर्यंत पुलाच्या खाली सावली राहत असल्यामुळे उड्डाण पुलाखालून जाणाऱ्या वाहनांचा प्रवास हा बराचसा सावलीतून होतो. मात्र, मध्यवर्ती बस स्थानक तसेच हमालपुरा परिसरातून राजकमल चौकाकडे येणाऱ्या वाहनचालकांना उन्हाचे चटके सहन करतच राजकमल चौकापर्यंत यावं लागतं. यामुळे या दिशेने राजकमल चौकात येणाऱ्या वाहनचालकांना सिग्नल बंद असले, तेव्हा चौकात लावलेल्या ग्रीन नेटच्या सावलीत सिग्नल सुरू होईपर्यंत थांबताना मोठा दिलासा मिळतो आहे. याचप्रमाणे अंबादेवी मंदिर परिसरातून गांधी चौक मार्गे राजकमल चौकाच्या दिशेने येणाऱ्या वाहन चालकांना सुद्धा चौकात दुसर्या दिशेने लावण्यात आलेल्या ग्रीन नेटच्या खाली उन्हाचे चटके सहन करून आल्यावर काहीसा दिलासा मिळतो आहे.
अमरावतीकरांची सेवा हाच उद्देश - नागपूर शहरात कडाक्याच्या उन्हामुळे ट्रॅफिक सिग्नलवर होणारी गर्दी टाळण्यासाठी चक्क ट्राफिक सिग्नल बंद करण्यात आले आहे. अमरावतीत मात्र राजकमल या मुख्य चौकात उन्हामुळे ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवले, तर वाहतुकीची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे. मात्र, अशी काही वेळ येऊ देण्यापूर्वीचा आम्ही या ठिकाणी दोन्ही बाजूला ग्रीन नेट लावून अमरावतीकरांना त्रास होऊ नये, याची काळजी घेतो आहे, असे अंबापेठ प्रभागाचे भाजपचे नगरसेवक अजय सारसकर 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले. मी नगरसेवक होण्यापूर्वी अर्थात सहा वर्ष आधीच भाजपचा साधा कार्यकर्ता असताना राजकमल चौकात नागरिकांच्या सोयीसाठी पहिल्यांदाच ग्रीन नेट लावली होती. माझा हा उपक्रम सहा वर्षांपासून सुरू आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच राजकमल चौकात दोन्ही बाजूला ही ग्रीन नेट बांधण्यात येते. संपूर्ण उन्हाळाभर ट्रॅफिक सिग्नलवर थांबणाऱ्या दुचाकीस्वारांना ऑटो रिक्षा चालकांना तसेच सर्वच लहान मोठ्या वाहनचालकांना दिलासा मिळतो, हाच माझ्यासाठी मोठा आनंद असल्याचे अजय सारसकर म्हणाले.
हेही वाचा - Rahul Gandhi in Warangal : काँग्रेसचे सरकार बनताच, 2 लाख रुपये शेती कर्ज माफ केले जाईल - राहुल गांधी