अमरावती - संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत आहे. या दुष्काळामुळे वरुड मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे लाख मोलाचे संत्रा पीक आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ४६ हजार हेक्टर लागवड असणाऱ्या या तालुक्यात १८ हजार हेक्टर संत्रा वाळला आहे. तरीसुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करित आहे. या समस्येकडे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने वरुड कृषी कार्यालयासमोर कृषी दिनानिमित्त कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा निषेध करण्यात आला.
पोटच्या गोळ्याप्रमाणे वाढवलेली संत्र्याची झाडे ही उष्ण तापमानामुळे वाळली आहेत. वाळलेल्या झाडांचे दृष्य पाहून शेतकऱ्यांचे मन हेलावून गेले आहे. त्यामुळे या संत्रा झाडांचे पंचनामे करुण हेक्टरी १ लाख रुपये अनुदान मिळावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कृषी दिनाचे निमित्त साधून, वरुड येथील कृषी कार्यालयात राज्याचे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा निषेध करण्यात आला. कृषीमंत्री पदाचा उपयोग फक्त सोशल मिडीयामध्ये झळकत राहण्याकरिता करता काय? असा सवाल देखील शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांना केला आहे. यावेळी कृषी मंत्र्याच्या विरोधात प्रचंड आक्रमक घोषणाबाजी करण्यात आली. स्वाभिमानीचे विदर्भ प्रमुख देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.