अमरावती- रात्रीच्या अंधारात शेतातील संत्री चोरणारी टोळी काल (सोमवारी) रात्री स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली. त्यांच्याकडून दोन वाहनांसह साठ कॅरेट संत्री, असा एकूण 11 लाख 32 हजार 400 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. याप्रकरणात अमरावतीच्या नागपुरी गेट परिसरातील आठ जणांना पोलिसांनी अटक केली.
हेही वाचा- देशभरातील ठळक घडामोडींवर एक नजर...
सध्या अमरावती जिल्ह्यात शेतमालाच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. पोलीस अधिक्षक डॉ. हरी बालाजी एन यांनी या प्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्ह्याच्या विविध भागात बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश दिले होते. पोलीस अधिक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने अमरावती ते परतवाडा मार्गावर नाकेबंदी केली. दरम्यान, सोमवारी रात्री 11 वाजता एक बोलेरो पिकअप व्हॅन पोलिसांनी थांबवली. या वाहनामध्ये सात कॅरेट संत्री असल्याचे आढळून आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाहनातील संत्र्याची चौकशी केली. याच गाडीच्या मागे दुसरी एक गाडी मागे येताना दिसली. पोलिसांनी ती गाडीही थांबवली. यात पाच जण बसले होते. त्यांची चौकशी केली. यात अग्रवाल यांच्या शेतातून या टोळीने रात्री संत्री चोरल्याचे समोर आले.
सोमवारी रात्री 11 वाजतापासून मंगळवारी पहाटे 3 वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. अमरावती येथील नागपूरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बिस्मिल्ला नगर येथील रहिवासी नूर शहा, मोहम्मद शहा, यासह आठ जणांना परतवाडा येथील सरमसपूरा पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे. या टोळीने यापूर्वी शेतांमध्ये चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील किंगे यांनी 'इटीव्ही भारत'शी बोलतना दिली.
पोलीस अधिक्षक डॉ. हरी बालाजी यन यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेल्या या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील किनगे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पेंदोर, मूलचंद भांबुरकर, सुनील तिडके, सचिन मिश्रा, शकील चव्हाण, संदीप लेकुरवाळे, चेतन दुबे, तसेच वाहन चालक नितेश तेलगोटे यांनी ही कारवाई केली.