अमरावती - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ऑनलाइन शिक्षणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांना तांत्रिकदृष्ट्या विद्यार्थ्यांपेक्षा एक पाऊल पुढे असणे आवश्यक आहे. यासाठीच अमरावती जिल्ह्यातील शिक्षक आपल्या घरात बसून सध्या ऑनलाइन प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्मार्ट होत आहेत.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांनी व्यावसायिक विकास मंचच्या माध्यमातून आणि लीडरशिप फॉर इक्विटी या संस्थेच्या मदतीने ही महत्वपूर्ण कार्यशाळा घेतली आहे. या ऑनलाइन कार्यशाळेद्वारे जिल्ह्यातील एकूण ३ हजार २६५ शिक्षक घरबसल्या तंत्रज्ञानात निपुण होत आहेत. या कार्यशाळेमध्ये जिल्ह्यातील सर्वच व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीला शिक्षण देणाऱ्या ३ हजार ३६४ शिक्षकांनी सहभाग घेतला आहे. १७ जूनपासून ही कार्यशाळा सुरू झाली असून तिचा समारोप २७ जूनला होणार आहे. या दहा दिवसात एकूण सहा विषयांवर ही कार्यशाळा होत आहे. यामध्ये झूम अॅप, गुगल खाते, गुगल फॉर्म, दृकश्राव्य साहित्य निर्मिती, दीक्षा ॲप, एल ओ स्मार्ट क्यू अॅप, विविध शैक्षणिक मोबाईल अॅप्स विकसन आणि निर्मिती आदी विषयांचा समावेश असल्याची माहिती अधिव्याख्याते आणि सत्र संचालक दीपक चांदूरे यांनी' ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
ही कार्यशाळा शिक्षकांच्या मागणीनुसार होत असल्यामुळे शिक्षक त्यांच्या सोयीनुसार या कार्यशाळेत सहभागी होत आहे. झूम ॲप फेसबुक आणि यूट्यूब अशा विविध माध्यमातून शिक्षकांना तज्ञांकडून मार्गदर्शन मिळत आहे. विशेष म्हणजे हे प्रशिक्षण लाईव्ह असल्यामुळे शिक्षकांना त्यांच्या शंका, प्रश्न तज्ञांना तत्काळ विचारून आपल्या अडचणी सोडविता येतात. यासोबतच शिक्षकांच्या व्हाट्स अॅप ग्रुपमध्ये विविध व्हिडीओ, लिखित साहित्य व स्थानिक तज्ञ मार्गदर्शकांकडून प्रात्यक्षिकाद्वारे शिक्षकांना तांत्रिकदृष्ट्या निपूण करण्याचा प्रयत्न होत आहे.
काही घरांमध्ये आई किंवा वडील हे शिक्षक आहेत तसेच त्यांचे मुलही शिक्षक आहेत. अनेक घरांमध्ये शिक्षकांच्या मुलांना, नातवांना देखील स्मार्ट टीव्ही किंवा लॅपटॉप च्या माध्यमातून कार्यशाळेतून मिळणाऱ्या तंत्रज्ञानाच्या धड्यांचा लाभ होतो आहे. अगदी झिरो बजेटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षक हे ऑनलाइन शिक्षण प्रणालीसाठी तांत्रिकदृष्टीने अपडेट होत आहेत.