अमरावती - जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या ११२ वरती पोहोचली आहे. धामणगाव रेल्वे शहरातील धवणेवाडी परिसरात एका तरुणीला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे धामणगाव रेल्वे परिसरात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
प्रशासनाच्यावतीने धवणेवाडी परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला असून परिसराचे निर्जंतुकीकरण सुरू आहे. पॉझिटिव्ह तरुणीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे विलगिकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण धामणगाव शहरात तीन दिवसीय जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे.
दवाखाने आणि मेडीकल वगळता सर्व आस्थापना बंद राहणार आहेत. आजपासून या तीन दिवसीय कर्फ्यूला सुरुवात झाली. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी धामणगाव रेल्वे शहराला भेट दिली.