अमरावती - येथे नागपूरहुन आलेल्या एका २१ वर्षीय तरुणीस कोरोनाची लागण झाली आहे. तिला नागपूर येथून आल्यानंतर ताप आल्यामुळे प्रथम धामणगाव, अमरावती त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे येथे दाखल करण्यात आले होते. आज सकाळी तिचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
धामणगाव रेल्वे येथील धनेवाडी आंबेडकर नगर परिसरातील एक तरुणी पंधरा दिवसापूर्वी नागपूर येथून आली. ताप खोकला असल्याने ती ३ मे रोजी धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी गेली होती. येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश साबळे यांनी सदर युवतीला घशाचा त्रास अधिक वाढल्याने अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र, तिची प्रकृती अधिक गंभीर झाल्याने तिला वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी सदर युवतीचे घशाचे स्वॅब घेऊन तपासणीकरता पाठवण्यात आले होते. आज(सोमवारी) सकाळी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
तर, धामणगावचे तहसीलदार भगवान कांबळे यांनी पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, महसूल विभागाची तातडीने बैठक घेऊन ती राहत असलेला परिसर सील करण्यास सांगितले. संबंधित नातेवाईकांचे घशाचे स्वॅब घेण्याची प्रक्रिया आरोग्य विभागाने सुरू केली आहे. तसेच या रुग्णाची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासली जात आहे. या भागात घरकाम करणाऱ्या महिला, बुधवार बाजार येथील काही व्यक्ती तसेच पेंटिंग काम करणाऱ्याची संख्या अधिक आहे. त्यामुळे, संबंधित कामगारांना घरीच राहण्याचे आवाहन तहसीलदार भगवान कांबळे व दत्तापूरचे ठाणेदार ब्रह्मानंद शेळके यांनी केले आहे.