अमरावती - तिवसा तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथे एका ६० वर्षीय अपंग वृध्दाचा खाटेवरच झोपलेल्या अवस्थेत जळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बाजूला पेटलेल्या चूलीतील ठिणगी गादीवर पडल्याने ही आग लागून त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. हरिदास बालाजी वाघमारे (वय. ६०) रा.शेंदूरजना बाजार जिल्हा अमरावती, असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मृत व्यक्ती गेल्या अनेक वर्षांपासून आजारी होती. पायाने अपंगत्व आलेल्या अवस्थेत ते अनेक वर्षांपासून मरणावस्थेत राहत्या घरी खाटेवर पडून होते. सकाळी बाजूला चूल पेटली असतांना त्याची ठिणगी खाटेवरील गादीवर पडली. वृद्ध इसम गादीवर झोपला होता. मात्र, तो अपंग असल्याने त्यांला हातपाय हलवता आले नाहीत. यामुळे त्यांचा आगीत जळून मृत्यू झाला. मृत व्यक्ती अंत्यत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत होती, त्यांची पत्नी शेतात मजुरीसाठी गेली होती. आग लागली तेव्हा शेजारील नागरिकांना त्यांच्या घरातून धूर येतांना दिसला. मात्र, ते तेथे पोहोचेपर्यंतच वाघमारे यांचा मृत्यू झाला होता.