अमरावती - जिल्हाधिकारी कार्यालयातील वित्त लेखा आणि फौजदारी विभागात सोमवारी सुमारे तीन तास कर्मचारी नसल्यामुळे शुकशुकाट होता. विभागातील सहकारी महिला कर्मचाऱ्याकडे कार्यक्रमानिमित्त जेवणाचे आमंत्रण आसल्याने विभागातील सारेजण एकाच वेळी जेवायला गेले होते. यामुळे कार्यालय ओस पडेल आणि कामासाठी आलेल्या अनेकांचा काम रेंगाळली.
सोमवारी दुपारी 1.30 च्या सुमारास शेतकरी नेते संजय कोल्हे हे मोर्शी तालुक्यातील काही लोकांना घेऊन विविध कामाच्या परवान्यांनंसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील वित्त लेखा आणि फौजदारी विभागात आले होते. यावेळी या कार्यालयात एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. आता काही वेळात कर्मचारी येतील म्हणून संजय कोल्हे यांनी काही वेळ प्रतीक्षा केली मात्र, दुपारचे चार वाजून गेले तरी विभागात एकही कर्मचारी परत आला नाही. या विभागालगत असणाऱ्या निवासी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे संजय कोल्हे यांनी नेमके कर्मचारी कुठे गेले याबाबत चौकशी केली असता विभागातील एका महिला कर्मचाऱ्याकडे कार्यक्रम असल्याने सर्व कर्मचारी त्यांच्याकडे जेवणासाठी गेल्याचे त्यांना सांगण्यात आले.
सहकारी कर्मचाऱ्याकडे एकाच वेळी वित्त लेखा आणि फौजदारी विभागातील सर्वच कर्मचारी जेवायला गेल्यामुळे या विभागातील एकूण 24 ते 25 टेबल, खुर्च्या जवळपास तीन तास रिकाम्या होत्या. आम्ही महत्त्वाच्या कामासाठी 40 ते 50 किलोमीटर अंतरावरून अमरावतीत आलो असताना येथे कर्मचारी हजर नसणे हे योग्य नाही. विविध कामाचे परवाने संपुष्टात येण्याची 31 डिसेंबर ही शेवटची तारीख असून त्यापूर्वी लोकांची कामे होणे आवश्यक आहे. असे असताना एकाच वेळी वित्त लेखा आणि फौजदारी विभागातील सर्वच कर्मचारी सहकारी कर्मचाऱ्याकडे जेवायसाठी जातात हे योग्य नाही. निदान चार-पाच जणांनी आधी जाऊन काही लोकांनी नंतर जाणे योग्य वाटले असते. मात्र, एकाच वेळी विभागातील सर्वच कर्मचारी बाहेर जेवायला जातात हे योग्य नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी जाब द्यावा कसे संजय कोल्हे 'इटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले.