अमरावती - जिल्ह्यातील बडनेरा येथे अचानक 40 ते 60 कोंबड्या मृत्युमूखी पडल्याने खळबळ उडाली होती. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यू झालेल्या कोंबड्याचे नुमने तपासणीसाठी पाठवले आहेत. मात्र, त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. आज दुपारपर्यंत हा अहवाल येणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय राहाटे यांनी दिली आहे.
जिल्हा प्रशासन घेत आहे काळजी -
बडनेरा येथे मृत्यू झालेल्या पक्षांपैकी 6 पक्षाचे नमूने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत. असे असले तरी अमरावती जिल्हातील पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूची लक्षणे दिसत नाहीत. मात्र, खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासन योग्य काळजी घेत आहे. मृत्यू झालेल्या कोंबड्यांचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेला नाही, असे पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी सांगितले.
बर्ड फ्ल्यू म्हणजे काय?
बर्ड फ्ल्यू हा एक संसर्गजन्य आजार आहे. हा विषाणू असून या आजाराची सुरुवात 1997 मध्ये हाँगकाँग येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये झाली होती. तेव्हापासून हा आजार जगाची पाठ काही सोडताना दिसत नाही. एव्हीयन इन्फ्ल्युएन्झा व्हायरस (H5N1) या विषाणूमुळे हा आजार पक्षांमध्ये होतो. तर, या आजाराने संक्रमित झालेल्या पक्षांच्या संपर्कात आल्यास मानवाला याचा संसर्ग होतो. याकडे दुर्लक्ष केल्यास, वेळेत उपचार न मिळाल्यास मृत्यू ओढावू शकतो.
असे होते संक्रमण
पक्षांना, त्यातही कोंबड्यांना नैसर्गिकरित्या या विषाणूचा संसर्ग होतो. या आजारात कोंबडी, पक्षी मोठ्या संख्येने मृत्युमुखी पडतात. तर, हा आजार झालेल्या कोंबड्यांच्या-पक्षांच्या संपर्कात आल्यास त्यांच्या मल, अनुनासिक स्त्राव, तोंडातील लाळ आणि डोळ्यातील पाणी याद्वारे मानवाला बर्ड फ्ल्यूचा संसर्ग होतो.