अमरावती - लॉकडाऊन लावून काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे, नुकसान झाले. नुकसान भरपाई द्या, नंतर लॉकडाऊन लावा, या मागणीसाठी आज जिल्हा परमिट रूम असोसिएशनचे नितीन मोहोड यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची भेट घेतली. मात्र, मागणी मान्य न झाल्याने उद्यापासून सर्व व्यावसायिक आपली दुकाने उघडणार असल्याची माहिती मोहोड यांनी दिली.
हेही वाचा - शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांचा अमरावतीत कोविड रुग्णालयात विनामास्क घुसण्याचा प्रयत्न..
दरम्यान, अशा प्रकारे कोणी दुकाने उघडून लॉकडाऊन मोडण्याचा प्रयत्न केला तर त्या लोकांवर कारवाई करू, असा इशारा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिला आहे.
लोकांच्या प्रश्नांपासून तोंड लपवण्यासाठी लॉकडाऊन
लोकांच्या प्रश्नांपासून तोंड लपवण्यासाठी व लोकांच्या मोर्चांपासून वाचण्यासाठी हे सरकार कोरोनाला समोर करून लॉकडाऊन लावत आहे. त्यामुळे, कोरोना कसा नौटंकी आहे, हे आम्ही सिद्ध करू शकतो, त्यामुळे उद्या सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडावी. जे काही गुन्हे दाखल करायचे आहे ते करा, मी कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार आहे, असे शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी सांगितले.
हेही वाचा - अमरावतीमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरूवात