अमरावती - स्थानिक नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत प्रहार गटाचे नितीन कोरडे यांची वर्णी लागली. त्यांना प्रहार, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष अशी ९ नगरसेवकांची मते मिळाली. तर भाजपाचे गोपाल तिरमारे यांना ८ मते मिळाली. विशेष म्हणजे पालिकेत सर्वाधिक नगरसेवक असूनही भाजपाला सत्ता टिकवून ठेवण्यात अपयश आले.
रवींद्र पवार यांच्या निधनामुळे अध्यक्षपद होते रिक्त
नगराध्यक्ष रवींद्र पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी शुक्रवारी नगरपालिका सभागृहात पोटनिवडणूक घेण्यात आली. भाजपातर्फे गोपाल तिरमारे तर प्रहार गटातर्फे नितीन कोरडे यांनी अर्ज दाखल केले होते. पालिकेचे संख्याबळ भाजपा ७, प्रहार ४, राष्ट्रवादी २ तर अपक्ष ४ असे आहे. यात दिवंगत नगराध्यक्ष रवींद्र पवार हे थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून आले होते. मात्र त्यांच्या निधनानंतर रिक्त जागेवर आज झालेल्या निवडणुकीत प्रहार गटाचे नितीन कोरडे यांची ९ नगरसेवकांच्या समर्थनाने निवड झाली तर भाजपाचे गोपाल तिरमारे यांना ८ मते मिळाली.
असे झाले मतांचे विभाजन
नितीन कोरडे यांना प्रहारचे सरदार खान, फातिमा बी, उषा माकोडे, वैशाली खोडपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आबीद हुसेन, चंदा खंडारे, तसेच अपक्ष नगरसेवक लविना अकोलकर, नजीर कुरेशी अशी ९ नगरसेवकांची मते मिळाली. तर भाजपाचे गोपाल तिरमारे यांना अतुल रघुवंशी, विजय विल्हेकर, टिकू अहिर, मीना काकडे, मीरा खडसे, वैशाली घुलक्षे यांच्यासह अपक्ष मनीष नांगलिया यांची ८ मते मिळाली. नितीन कोरडे यांचा विजय जाहीर होताच प्रहार कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला
दिवंगत रवींद्र पवार यांना श्रद्धांजली
नवनिर्वाचित नगराध्यक्ष नितीन कोरडे व त्यांच्या गटातील नगरसेवकांनी निवड होताच दिवंगत नगराध्यक्ष रवींद्र पवार यांचा फोटो नागराध्यक्षांच्या खुर्चीवर ठेवून प्रतिमेचे पूजन केले. यावेळी नितीन कोरडे यांच्यासह उपस्थित नगरसेवकांनी रवींद्र पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.