अमरावती - देशातील काँग्रेसची कधी राष्ट्रवादी काँग्रेस, कधी रेड्डी काँग्रेस तर कधी चड्डी काँग्रेस झाली अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे येथे भाजप उमेदवार प्रताप अडसड यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेत ते बोलत होते.
65 वर्षात काँग्रेस पक्षाने देशाचा कोणता विकास केला याचे चिंतन करणे गरजेचे असल्याचे गडकरी म्हणाले. संत्रा स्वस्त आहे पण त्याच संत्राचा जूस हा महाग आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. पिकले तर भाव मिळत नाही आणि भाव मिळाला तर पिकत नाही. त्यामुळे मजबुरीमधून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे गडकरी म्हणाले.
हेही वाचा - 'काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यांनी पाकिस्तानला बळ मिळते...'
हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज जळगावात जाहीर सभा, कडक सुरक्षा व्यवस्था तैनात
आजही विदर्भात सिंचनाच्या सोयी ज्या प्रमाणात उपलब्ध पाहिजे त्या प्रमाणात नाहीत. अमरावती जिल्ह्यात सिंचनासाठी मी ३ हजार कोटी रुपये दिले आहेत. तर जिल्ह्याला 10 हजार कोटी रुपयाचे पॅकेज हे रस्त्यासाठी दिल्याचे गडकरी म्हणाले.
50 टक्के जमीन जर सिंचनाखाली आली तर विदर्भातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. आम्ही जे बोलून दाखवतो ते करून दाखवतो असेही गडकरी म्हणाले. मोदींच्या नेतृत्वात देशाचं तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रच चित्र बदलल्याचे गडकरी म्हणाले.
नागपूर ते बडनेरा, बडनेरा ते गोंदिया, नागपूर ते नरखेड मेट्रो सुरू करणार असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भातील 10 हजार तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. मेट्रो कंपनीचे तीन महिन्यांत भूमिपूजन होणार असल्याचे गडकरी म्हणाले.