अमरावती - सध्या विदर्भात उष्णतेची लाट असून अमरावती जिल्ह्यातील उष्णतेचा पारा 47 अंशावर पोहोचला आहे. या उन्हापासून पीकांचे संरक्षण करण्याचे प्रयत्न शेतकरी करत आहे. अमरावती जिल्ह्यातील एका डाळींब उत्पादक शेतकऱ्याने डाळिंबाच्या संरक्षणासाठी नामी शक्कल लढवली आहे. त्याने आपल्या अडीच एकर परिसरात लावलेल्या डाळींबाच्या झाडांना साड्या गुंडाळल्या आहेत.
अमरावती जिल्ह्यातील देवरा देवरी येथील रहिवासी असलेले प्राचार्य नीलेश देशमुख यांच्याकडे कापूस तळणी या गावालगत ५ एकर ओलीत शेती आहे. या ५ एकर शेतीपैकी अडीच एकरावर १० बाय १२ याअंतराने त्यांनी ४ वर्षांपूर्वी ७५० डाळिंबाच्या झाडाची लागवड केली आहे. मागील वर्षीपासून त्यांना उत्पन्नही सुरू झाले आहे. मात्र, यंदाच्या वर्षी तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने पिक धोक्यात आले आहे. याचा फटका डाळिंबाच्या पिकालाही बसू लागल्याने निलेश देशमुख यांनी एक अनोखी शक्कल लढवली. उन्हापासून व पक्षांच्या त्रासापासून डाळींब फळाचे रक्षण व्हावे यासाठी त्यांनी साडेसातशे झाडांना साड्या आवरण म्हणून बांधले. त्यासाठी त्यांनी २० रुपये प्रती किमतीने हजारो साड्या सुरत येथून खरेदी केल्या आहे. या नामी शक्कलमुळे त्यांच्या पीकाचे संरक्षण झाले.
इंटरनेटच्या माध्यमातून डाळींब पिकाचे चांगले नियोजन, वेळेवर पाणी, नियोजन बद्ध फवारणी, पक्षांपासून रक्षण व्हावे यासाठी हवेवर आवाज करणारे पंखे या सर्व नियोजनामुळे त्यांना डाळींब शेती फायद्याची ठरू लागली आहे. मागील वर्षी त्यांच्या डाळींबाला प्रती किलो ५० रुपये इतका दर मिळाला होता. रासायनिक शेती बरोबरच जैविक शेतीचा वापरही आपल्या शेतात करतात. त्यामुळे त्याच्या शेतातील डाळींब चांगल्या दर्जाचे व मोठे आहेत. त्यामुळे या डाळींब शेतीचा त्यांना चांगला फायदा होत असून इतर शेतकऱ्यांनीही पारंपरिक शेतीच्या मागे न लागता डाळिंबसारखी फायद्याची शेती करावी, असे देशमुख सांगतात.