अमरावती - कोरोनाचा कहर कायम असून शनिवारी दिवसभरात एकूण नवीन 12 कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे. अमरावतीत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या आता 325 वर गेली आहे. गांधी चौक परिसरात राहणाऱ्या 53 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना बरं वाटत नसल्याने त्यांनी राजापेठ परिसरातील खासगी डॉक्टरच्या सल्ल्याने नागपूर येथील खासगी प्रयोशाळेतून घशातील स्रावाची चाचणी करून घेतली असता, त्यांना कोरोना झाल्याचे समोर आले. त्यांना कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्या कुटुंबीयांना विलगिकरण कक्षात हलविण्यात आले आहे.
गांधी चौक हा शहरातील व्यस्त परिसर असून, महापालिकेचे कार्यालय आणि शहरातील बाजारपेठ या परिसरालगतच कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच गुरुवारी व्याघ्र प्रकल्प कार्यालयालगतच्या वन विभाग कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत जो कोरोनाबाधित कर्मचारी सापडला होता. त्याच्या 22 वर्षीय मुलीलाही कोरोना झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे वन विभाग कर्मचारी वसाहतीत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. यशोदा नगर परिसरात 19 वर्षाच्या युवतीला कोरोना झाला असून, शिरजगाव मोझर गावातील 30 वर्षीय पुरुषालाही कोरोना झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
शनिवारी कंपासपुरा परिसरातील 43 वर्षाच्या पुरुषांसह 20 वर्षाच्या युवकाला कोरोना झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारंजा लाड येथून अमरावतीला आलेल्या एका 63 वर्ष महिलेलाही कोरोना झाला असून तिला उपचारासाठी बेस्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमरावती शहरातील शारदा विहार परिसरातही कोरोनाचा शिरकाव झाला असून, परिसरात 19 वर्षाच्या युवकाला कोरोनाने ग्रासले आहे.
जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात येणाऱ्या लोणी टाकळी येथील 50 वर्षीय महिलेला ताप आदी लक्षण आढळून आल्यामुळे तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोबी रुग्णालयात हलविण्यात आले. अमरावती शहरातील कोरोनाचे हॉटस्पॉट असणाऱ्या मसान गंजी परिसरात 35 वर्षाच्या पुरुषासह 25 वर्षाच्या महिलेला कोरोना झाल्याचे समोर आले.
अकोला जिल्ह्यात येणाऱ्या मूर्तिजापूर तालुक्यातील काटेपूर्णा येथील 65 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लग्न झाली आहे. संजय गांधीनगर परिसरातही एका व्यक्तीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. प्रशासनाच्या वतीने काळजी घेण्याचे आवाहन अमरावतीकरांना करण्यात आले आहे.
राज्याची कोविड 19 परिस्थिती -
राज्यात शनिवारी १,५५० रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार ३४६ झाली आहे. दरम्यान, शनिवारी कोरोनाच्या ३,४२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५१ हजार ३७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.