अमरावती Navratri in Transgender Area : विदर्भातील सांस्कृतिक शहर असणाऱ्या अंबानगरीत नवरात्रौत्सव सर्वत्र आनंदात साजरा होत आहे. शहरातील निंभोरा परिसरात असणाऱ्या किन्नरांच्या वस्तीतही नवरात्राचा उत्साह पाहायला मिळतोय. नऊ दिवसांच्या या नवरात्रौत्सवानिमित्त किन्नरांच्या घरी विविध धार्मिक कार्यक्रम आनंदात साजरे होत आहेत.
किन्नरांच्या वस्तीत घटस्थापना : शहरातील निंभोरा परिसरात असणाऱ्या किन्नरांच्या वस्तीमध्ये सर्व किन्नर मिळून एका घरात घटस्थापना करण्यात आली. किन्नरांची अपार श्रद्धा असणाऱ्या यल्लम्मा आणि बहुचर मातेची स्थापना करून त्यांची दररोज विधिवत पूजा केली जाते. नवरात्रीनिमित्तानं त्यांच्या गुरुमातादेखील आल्या आहेत. नवमीला होम हवन सोहळ्याला अमरावतीसह अनेक भागातील किन्नर या उत्सवात सहभागी होतील, अशी माहिती येथील किन्नरांनी दिलीय.
आशीर्वादासाठी भाविकांची गर्दी : नवरात्र निमित्तानं किन्नरांच्या घरी अतिशय धार्मिक वातावरण असून घरासह संपूर्ण परिसर साफ, स्वच्छ करण्यात आलाय. नेटक्या, धार्मिक वातावरणस्थळी देवींची स्थापना करण्यात आली आहे. या नवरात्रौत्सव काळात किन्नरांच्या घरातील देवींचा आशीर्वाद घेण्यासाठी अमरावती शहरातील अनेक भाविक येत आहेत. नवरात्रौत्सव काळात किन्नरांचा आशीर्वाद हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळंदेखील अनेक कुटुंब किन्नरांच्या घरी देवीसह किन्नरांचाही आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी करत आहेत.
यल्लम्मा आणि बहुचर मातेची उपासना : किन्नर समाजामध्ये रेणुकामातेला सर्वाधिक मान आहे. महाराष्ट्रात आपण ज्या देवीला रेणुका माता म्हणतो, त्या देवीलाच दक्षिणेत यल्लमा देवी म्हणून ओळखलं जातं. देशभरातील सर्वच किन्नर यल्लमा देवीचे उपासक आहेत. यासोबतच बहुचर माता ही आमची कुलदैवत असल्याचं आचल राजपूत यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं. नवदुर्गा मातेची ज्याप्रमाणे पूजा केली जाते, त्याचप्रमाणे आम्ही नऊ दिवस यल्लमा आणि बहुचर मातेची उपासना करतो. आम्ही कुठलाही जातिभेद मानत नाही, असंदेखील आचल राजपूत यांनी स्पष्ट केलंय.
सर्वांचं कल्याण हेच देवीला मागणे : गणपती आणि गौरी- महालक्ष्मी प्रमाणेच आम्ही नवरात्र उत्साहात साजरा करतो. जातिभेद आम्हाला मान्य नाही. नवरात्रीचे नऊही दिवस आम्ही निरंक उपास करतो, अशी माहिती गुड्डी किन्नर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. नवरात्रीनिमित्त आमच्या घरी अनेक भाविक लोक येतात. अनेकांच्या अडचणी समस्या सुटाव्यात यासाठी ते आमच्या वतीनं देवीला त्यांचे प्रश्न मार्गी लागावे असा आशीर्वाद मागतात. आम्हीदेखील सर्वांचेच कल्याण होवो, असा आशीर्वाद देवीकडे मागतो, असंही गुड्डी किन्नर यांनी सांगितलं.
- धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन : नवरात्रौत्सवानिमित्त किन्नर समुदायाच्या वतीनं अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. सुंदर कांड, भजन गोंधळ असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आलं आहे. या सर्व धार्मिक सोहळ्यात अनेक भागातील भाविकदेखील सहभागी होत आहेत.
हेही वाचा :