अमरावती : फार पूर्वी राजस्थानमधून अनेक कुटुंब हे विदर्भातील विविध भागात स्थायिक झालेत. तिवसा तालुका आणि परिसरातदेखील राजस्थानातील अनेक राजपूत कुटुंबं आली होती. तिवसा येथील ताजी या राजपूत कुटुंबाची कुलदैवत राजस्थानमधील सवाई माधवपुर जवळ असणाऱ्या लालसोट गावात आहे.
ताजी कुटुंबातील पूर्वज सितारामसिंह ताजी साडेतीनशे ते चारशे वर्षांपूर्वी आपल्या कुलदैवतेच्या दर्शनासाठी राजस्थानमध्ये गेले असता त्यांनी तिथून श्री पिपलाज देवीचे दोन दगडी मुखवटे सोबत आणले. वाटेत ते कुऱ्हा या गावात रात्री मुक्कामी होते. सकाळी दिवसाकडे निघताना देवीचे मुखवटे ज्या कडुलिंबाच्या झाडाखाली ठेवले होते, त्या ठिकाणाहून हललेच नाहीत. यामुळे ज्या ठिकाणी देवी विराजमान झाली. त्याच ठिकाणी ताजी कुटुंबाच्या वतीनं मातीचं मंदिर बांधण्यात आलं. तेव्हापासून ही पिपलाज देवी कुऱ्हा येथे आहे, अशी माहिती ताजी कुटुंबातील सदस्य आणि या मंदिराचे विश्वस्त स्वर्गीय सुरेशसिंह ताजी यांच्या पत्नी अलकाताजी यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. तेव्हापासून आजपर्यंत या मंदिरात नवरात्रौत्सव थाटात साजरा होतो. वीस पंचवीस वर्षांपूर्वी या स्वर्गीय सुरेशसिंह ताजी यांच्या कार्यकाळात मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असंदेखील अलका ताजी यांनी सांगितलं.
निजामशाहीत देवीच्या मिरवणुकीवर बंदी : तीनशे वर्षांपासून पिपलाज देवी मंदिरात नवरात्र उत्सव साजरा होत असताना निजामशाहीत असणाऱ्या कुऱ्हा येथील या मंदिरातून नवमीच्या दिवशी गावात निघणारी मिरवणूक 1920 मध्ये बंद करण्यात आली होती. देश स्वतंत्र झाल्यावर 1951 मध्ये नवरात्रौत्सवात नवमीच्या दिवशी या देवीची मिरवणूक पुन्हा एकदा मंदिरातून गावात सुरू झाली, अशी माहिती मंदिराचे विश्वस्त संदीप राजपूत यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. गावात पिपलाज देवी ही मोठी देवी आणि दुसरी लहान देवी असे देवीचे दोन मंदिरं आहेत. लहान देवी ही बुंदेलखंडी राजपुतांनी आणली असल्याची माहितीदेखील संदीप राजपूत यांनी दिली. या दोन्ही मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त रोज सकाळी आणि सायंकाळी साडेसहा वाजता आरती होते. या आरतीला ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर राहतात. नवमीला गावात मोठा उत्सव असतो. ज्यांना राजस्थानमध्ये पिपलाज देवीच्या दर्शनाला जाणे शक्य नाही. असे सर्व राजपूत बांधव कुरा येथील देवीच्या दर्शनासाठी येतात असे संदीप राजपूत यांनी सांगितलं.
तेलंगणातून आलेल्या बालाजी मंदिरात उत्सव : निजामशाहीच्या काळात सुमारे 400 वर्षांपूर्वी तेलंगणा येथून तेलंगी ब्राह्मणांनी तिरुपती येथून बालाजीच्या पंचधातूच्या मूर्ती कुऱ्हा येथे आणल्या होत्या. या मूर्ती त्यावेळी गावातील गोविंद सोनार यांच्याकडे ठेवण्यात आल्या होत्या. पुढे गोविंद सोनार यांच्या घरीच मंदिर उभारून बालाजीच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली. पुढे निजामशाहीचा अस्त झाल्यावर भोसले घराण्याचे पंच सचिव आप्पाजी देशमुख यांच्याकडे या मंदिराचा कारभार सोपविण्यात आला. तेव्हापासून देशमुख घराण्याचे वंशज या मंदिराचे कामकाज पहात आहेत, अशी माहिती श्री बालाजी देवस्थानचे अध्यक्ष विजय देशमुख यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. नवरात्रौत्सवात दरवर्षी श्री बालाजी मंदिरात नवरात्र उत्सव साजरा केला जातो, असं विजय देशमुख म्हणाले.
श्री बालाजींच्या वाहनांची निघते मिरवणूक : नवरात्रोत्सवात दहा दिवस बालाजीच्या वाहनांची गावातून मिळवणूक काढण्यात येते. पहिल्या दिवशीच्या मिरवणुकीचे बालाजीचे वाहन हे नाग राहते. त्यानंतर चक्र, मोर, वाघ, गरुड, हनुमान, पाळणा अशा वाहनांवरून रोज रात्री नऊ वाजता मिरवणूक काढण्यात येते. दसऱ्याच्या दिवशी बालाजीची पालखी ही सायंकाळी काढण्यात येते. ही पालखी गावाबाहेर सीमोल्लंघन करून परत येते. बालाजी मंदिरात परत आल्यावर त्यांना सोनं अर्पण केल्यावर ग्रामस्थ दसरा साजरा करतात. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी बालाजींची मिरवणूक ही प्रतीकात्मक हत्तीवर काढली जाते. यावेळी बालाजीचं वाहन असणाऱ्या हत्तीवर गुलाल उधळल्या जातो. तसेच नारळ, पोहे ,लाडू, अनारसे असा प्रसाद ग्रामस्थांना वितरित करण्यात येतो, असे देखील विजय देशमुख यांनी सांगितले.
हेही वाचा :