अमरावती - नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात मुस्लीम संघटनेच्यावतीने अमरावती जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन केले जात आहे. या आंदोलनादरम्यान शनिवारी सकाळी बडनेरा रेल्वे स्थानकावर कुर्ल्यावरून येणारी शालिमार एक्सप्रेस मुस्लीम संघटनेने रोखून धरली.
हेही वाचा - अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न
नागरिकता संशोधन कायदा रद्द व्हावा, यासाठी मुस्लीम समुदायाच्यावतीने गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यातील विविध भागात आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी अमरावती-नागपूर महामार्गावर रस्ता रोको करून आंदोलन करण्यात आले होते. तर शनिवारी सकाळी पावणे नऊच्या दरम्यान बडनेरा रेल्वे स्थानकावर मुंबईकडून येणारी शालिमार एक्सप्रेस मुस्लीम संघटनांनी रोखल्यामुळे खळबळ उडाली. या आंदोलनामुळे ही गाडी जवळपास पंधरा ते वीस मिनिटे बडनेरा रेल्वे स्थानकावर उभी होती. बडनेरा पोलिसांसह रेल्वे पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ही गाडी नागपूरकडे निघाली.