अमरावती - टाळेबंदीच्या काळात वीज बिलात सवलत देण्याची तयारी दखवणाऱ्या उर्जा मंत्रालयाने आता वीज बिल वसुलीची मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे. थकबाकी वसूल करण्याचे आणि थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व कार्यालयास दिले आहेत. त्या आदेशांची अंमलबजावणी महावितरणने संपूर्ण राज्यात सुरू केली असून अमरावती जिल्ह्यातही थकीत वीज बिल ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे.
जिल्ह्यात २३१ कोटी ८५ लाख रुपयांची थकबाकी
डिसेंबर, २०२० अखेर राज्यात एकूण ६३ हजार ७४० कोटी रुपये थकबाकी झाली आहे. यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली असून डिसेंबर अखेर राज्यातील कृषीपंप ग्राहकांकडे ४५ हजार ४९८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. वाणिज्यिक, घरगूती व औद्योगिक ग्राहकांकडे ८ हजार ४३५ कोटी रुपये व उच्चदाब ग्राहकांकडे २ हजार ४३५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. अमरावती जिल्ह्यातील थकीत वीज बिलाची परिस्थिती पाहता जिल्ह्यात एकूण ३ लाख ६३ हजार ८८८ थकबाकीदार वीज ग्राहक असून त्यांच्याकडे २३१ कोटी ८५ लाख थकबाकी वसूल करण्याचे आव्हान महावितरण समोर आहे.
राज्यात मार्च २०२० मध्ये कोरोनामुळे टाळेबंदीच्या काळात थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित न करण्याचा निर्णय महावितरणने घेतला होता. थकबाकीदार ग्राहकांना वीज बिल सुलभ हप्त्यामध्ये भरण्याची सवलत महावितरणने दिली आहे. सोबतच थकबाकीवर विलंब आकार न लावण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. तसेच ग्राहकांच्या वीज बिलासंबंधी तक्रारी असल्यास त्या तत्काळ सोडविण्याचे आदेशही दिले आहेत. सर्व अधिकाऱ्यांना जानेवारीपासून वसुली मोहिम राबविण्याचे निर्देश महावितरणने दिले असून थकबाकी वसुलीत कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेतही दिले आहे.
हेही वाचा - महाविद्यालये सुरू करा, अभाविपचे राज्यव्यापी आंदोलन