अमरावती - खासदार म्हणून नवनीत राणा यांनी शनिवारी पहिल्यांदाच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचा आढावा घेतला .यावेळी खासदारांनी जिल्ह्यातील रस्ते आणि पुलांची माहिती जाणून घेतली. तसेच येणाऱ्या साडेचार वर्षात जिल्ह्यातील सर्व रस्ते समृद्ध होणार असा विश्वास खासदार नवनीत राणा यांनी आढावा बैठकीनंतर व्यक्त केला.
18 नोव्हेंबर पासून लोकसभेचे सत्र सुरू होणार असून या निमित्ताने शनिवारी खासदार नवनीत राणा यांनी जिल्ह्यातील रस्त्यांची माहिती जाणून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा यांच्यासह विभागाचे सर्व अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
![mp navneet rana visited pws department in amravati](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-amr-02-navneet-rana-take-meeting-at-pwd-vis-7205575_16112019163319_1611f_01701_524.jpg)
या बैठकीदरम्यान, मेळघाटात येणाऱ्या चिखलदारा आणि धारणी तालुक्यात काही रस्त्यांचे रुंदीकरण आणि पूल निर्मितीमध्ये वनविभागाकडून परवानगी मिळत नसल्याची अडचण अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा यांनी खासदार नवनीत राणा यांच्यासमोर मांडली. खासदार नवनीत राणा यांनी वरिष्ठ पातळीवर याबाबत चर्चा करून लवकरच मेळघाटमधील रस्त्यांच्या कामातील अडथळे दूर केले जातील असे बैठकीत स्पष्ट केले. अमरावती शहरातील अल्मास नगर, एमायडिसी, दस्तुर नगर, चमन नगर आदी भागातील रस्त्यांच्या कामातील अडथळे दूर करण्या संदर्भातही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
या बैठकीबाबत खासदार नवनीत राणा म्हणाल्या, आज मी पहिल्यांदाच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ही बैठक सकारात्मक आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी कामाच्या बाबतीत सकारात्मक वाटले. आता येणाऱ्या साडेचार वर्षात जिल्ह्यातील सर्व रस्ते समृद्ध करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.