अमरावती - राज्यात मॉन्सूनचे आगमन झाले आहे. मात्र, अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. तरीही शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात एका शेतात सोयाबीनची पेरणी सुरू असताना खासदार नवनीत राणा तेथे पोहचल्या. राणांनीही शेतात महिलांसोबत पेरणी केली. दरम्यान पेरणी करताना कर्जमाफीवरून राणांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
सध्या खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर पेरणीच्या कामाला लागला आहे. गेल्या वर्षीही खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी एका शेतात जाऊन पेरणी केली होती. यावर्षी सुध्दा खासदार नवनीत राणा यांनी एक शेत गाठून सोयाबीनची पेरणी केली. यावेळी बोलताना सरकारचे काही बँकांना लेखी आदेशच नसल्याने शेतकऱ्यांना नवीन कर्ज उपलब्ध होत नसल्याची टीका खासदार राणा यांनी केली.
लॉकडाऊनमुळे सर्व कारखाने आणि उद्योगधंदे बंद होते. मात्र, शेतकऱ्यांचे काम थांबले नव्हते. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात गोरगरीबांना राज्य व केंद्र सरकार ने जो धान्यपुरवठा केला तो केवळ शेतकऱ्यांमुळेच शक्य होऊ शकला, असे म्हणत खासदार नवीन राणांनी शेतकऱ्यांचे आभार मानले.