अमरावती - नुकतेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या जमिनीवर पेरणी करण्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या खासदार नवनीत राणा यांनी आज या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले. "मेळघाटात सुमारे २०० वर्षांपेक्षा अधिक काळापासून शेती करणाऱ्या आदिवासींना शेती करू नका? असे कसे काय म्हणता येईल. पिढ्यांपिढ्या मेळघाटात राहणारे आदिवासीही माणसंच आहेत. ते जमिनीत पेरणी करणार नाही, तर काय खाणार? कसे जगणार? आणि आपल्या मुलांना शिक्षण कसे देणार?" अशा प्रकारे नवनीत राणा यांनी संतप्त प्रश्न उभा केले आहेत. मेळघाटातील आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी गल्ली पासून दिल्लीपर्यंत लढा देण्याचा निश्चय नवनीत राणा यांनी केला असल्याचे सांगितले.
खासदार नवनीत राणा सोमवारी मेळघाट दौऱ्यावर असताना, सेमाडोह येथील शेतकरी सन्नू रामलाल चव्हाण यांच्या शेतात पेरणी केली; आणि एकच वादंग उठले. सन्नू रामलाल चव्हाण यांनी वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केले असल्याचे वनविभागाने म्हटले आहे. सेमाडोह वनपरिक्षेत्रातील वनखंड क्रमांक १७६ मध्ये येणाऱ्या या जमिनीवर पेरणी करण्यास व्याघ्रप्रकल्पाने मनाई केली आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. सीवाबला एस. यांनी या जमिनीबाबत उपविभागीय समितीकडे वनहक्क दावा प्रलंबित आहे का? असल्यास किती क्षेत्र संबंधीत दाव्यावर नमूद आहे? संबंधित दाव्यांची मागणी केव्हापासून आहे? याबाबत सविस्तर माहिती मागितली आहे.
सन्नू रामलाल चव्हाण यांचे शेत वनविभागाअंतर्गत असेल तर खासदार नवनीत राणा यांच्या अडचणी वाढू शकतात. खासदार नवनीत राणा यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत आपली भूमिका 'ईटीव्ही भारत'शी बोलताना स्पष्ट केली.
राणा म्हणाल्या, "मेळघाटातील आदिवासी दोनशे वर्षांपेक्षा अधिक काळापासून शेती करत आहेत. ते पेरणार नाही तर काय खाणार, कसे जगणार? आपल्या मुलांना कसे शिकवू शकणार? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली.
"मी सोमवारी मेळघाटात असताना शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी त्यांच्यासोबत पेरणी केली. मेळघाटातील आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी खासदार या नात्याने मी दिल्लीपर्यंत प्रयत्न करणार आहे. वनविभाग आदिवासींना त्यांच्या गाई-म्हशी गावापासून ७ किमी बाहेर चरायला जायला सांगतात; दररोज १४ किमी जाणे येणे हा शेतकऱ्यांसोबत जनांवरांवरही अन्याय आहे. मी कायद्याचा पूर्ण आदर करते. असे असले तरी माणसाला माणसांप्रमाणे जगता यावं हे अत्यंत महत्वाचे आहे. मी जे काही केले त्याबाबत मला कुठलीही खंत नाही. आदिवासींसाठी मला कितीही लढावे लागले तरी, मी माझा लढा कायम ठेवणार!" असे नवनीत राणा यांनी प्रतिपादन केले.