अमरावती - मी कोणाला घरी बसवले, कोणाला जिल्ह्याबाहेर पाठवले, किती लोकांचे मर्डर केले याची त्यांनी यादी द्यावी. चोराला सगळेच चोर दिसतात. आरोप करताना इतका बालिशपणा, नादानपणा आणि नालायकपणा का केला जातोय, असा सवाल अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार व खासदार आनंदराव अडसूळ यांनी उपस्थित केला. अडसुळ यांनी काही लोकांचे जीव घेतले, असा आरोप नवनीत राणांनी केला होता. त्याला आज अडसूळ यांनी उत्तर दिले.
अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान १८ एप्रिल रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिस्पर्धी उमेदवार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार खासदार आनंदराव अडसूळ व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी अडसूळ यांच्यावर २ दिवसांपूर्वी गंभीर आरोप केला होता. त्यावर आनंदराव अडसूळ यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना नवनीत राणा यांच्यावर पलटवार केला.
प्रत्युत्तर देताना नवनीत राणांबद्दल अडसूळ म्हणाले, राणा दाम्पत्य काय धंदे करतात हे पूर्ण जगाला माहीत आहे, असे धंदे आम्ही करत नाही. म्हणून आमच्या पक्षाची चिंता कारायची त्यांना गरज नाही.
मुबंईत गुन्हेगारी जगतात वावरणारा युसूफ लकडवाला यांच्याशी राणा दाम्पत्याचे संबंध आहे. निवडणुकीसाठी लकडवाला यांच्याकडून नवनीत राणा यांनी ८० लाख घेतले, असा आरोपही खासदार अडसूळ यांनी केला. हायकोर्टाने नवनीत राणा यांच्या जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवले असल्याचेही ते म्हणाले.