अमरावती - मासे पकडण्यासाठी गेलेल्या मोझरीतील एका मच्छिमार तरुणाचा माहुली जहागीर हद्दीतील वाघोली परिसरातील धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे सातच्या सुमारास घडली. राहुल प्रल्हाद कुकडे (वय १९) असे धरणात बुडून मृत्यू झालेल्या मच्छिमार तरुणाचे नाव आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राहुल मासे विक्रीचा व पकडण्याचा व्यवसाय करत होता. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीमच्या वतीने त्याचा मृतदेह धरणाच्या बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला एक तासातच यश आले. यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूरांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मोझरी येथील राहूल प्रल्हाद कुकडे हा मच्छिमार तरुण शुक्रवारी सकाळच्या सुमारास जावयांसोबत माऊली जहागीर परिसरातील वाघोली येथील धरणावर मासे पकडण्यासाठी गेला होता. गुरूवारी या धरणात मासेमारीसाठी राहुलने जाळे टाकले होते. त्यानंतर आज त्यातील मासे काढण्यासाठी पहाटे सातच्या सुमारास ते धरणावर गेले. त्यानंतर थर्माकोलच्या नावेवर बसून राहुलने जाळ्यातील मासे काढण्यास सुरुवात केली असता तो अचानक पाण्यात पडला आणि जाळ्यात अडकून त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. राहूलच्या मृत्यूची बातमी कळताच मोझरी गावकऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.
उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारेंच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, उपपथक प्रमुख मारोती नेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीम कर्मचारी हेंमत सरकटे, कौस्तुभ वैद्य, योगेश घाडगे, दीपक डोळस, आकाश निमकर, अर्जुन सुंदरडे, भूषण वैद्य, देवांनद भुजाडे, उदय मोरे, चालक प्रमोद सिरसाट यांनी मृतदेह तलावातून बाहेर काढला. यावेळी माहुली जहागीरचे पोलीस निरीक्षक प्रवीण वेरुळकर, अमरावती तहसिलचे उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, तहसीलदार संतोष काकडे, दिनेश बढीये नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी राजू दंडाळे, तलाठी गुळधे उपस्थित होते.
राहुल ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा कामात करायचा नेहमी सहकार्य -
राहुल कुकडे बालपणापासून पोहण्यात तरबेज होता. त्यामुळे मोझरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात तो नेहमी तत्पर असायचा. ग्रामपंचायत मोझरी नळयोजनेच्या विहरित तो अलगद उतरून मोटार पपं काढण्यात त्याची नेहमी मदत मिळायची.
कुटुंबियांचा आधारवड हरवला -
राहुलच्या कुटुंबाची परिस्थिती म्हणजे जेमतेम होती. अगदी कमी वयापासून तो मासे विक्रीचे काम करत होता. त्याच्या या कमाईतून कुटुंबाच्या उदरनिर्वाह चालण्यासाठी मोठी मदत होत होती. मात्र, आता राहुल निघून गेल्याने कुटुंबियांचा आधारवड हरवला आहे.