अमरावती - अनेक पती-पत्नीच्या सुखी संसारात विष कालवण्याचे काम दुसरा तिसरा कोणी करत नसून हातातील मोबाईल करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरावती शहरातील पोलीस आयुक्तालयातील महिला सेलमध्ये दाखल झालेल्या तक्रारीमध्ये पती पत्नीच्या वादाला मोबाईल कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे.
समाज माध्यमे, मोबाईल, लॅपटॉप, टॅब या इंटरनेटवर चालणाऱ्या अत्याधुनिक संवादाच्या माध्यमामुळे जग आपल्या तळहातावर आले आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे मोबाईच्या स्क्रीनवर थिरकनाऱ्या बोटांनी आपले कामे सहज व कमी वेळात होऊ लागली. जगाची सगळी माहिती एका क्लिकवर मिळू लागली. अनेक सकारात्मक गोष्टी मोबाईलमुळे सहज शक्य होत असल्या तरी त्याच्या अतिवापरामुळे पती पत्नीच संसारात वाद होत असल्याचे समोर आले आहे. मोबाईलचा अतिवापर वाढल्याने हक्काची नाती दूर जात असल्याचे भयाण वास्तव हे अमरावतीच्या महिला सेलमध्ये आलेल्या तक्रारी वरून समोर आल्याची माहिती महिला सेलच्या पोलीस उपनिरीक्षक प्रशाली काळे यांनी दिली.
या महिला सेलमध्ये 2017 मध्ये 430 पैकी 247 तर 2018 मध्ये 575 पैकी 475 तर मागील ६ महिन्यांत दाखल झालेल्या 221 तक्रार अर्जांमध्ये सदर कारणे नमूद करण्यात आली. त्यातील 198 प्रकरणात समझोता करण्यात आला आहे. आलेल्या तक्रारीत पती पत्नीच्या बहुतांश नात्यात कटुता आणण्यास मोबाइल कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे. अमरावती शहरातील पोलीस आयुक्तालयात महिला तक्रार निवारण केंद्र उभारण्यात आले आहे . पती-पत्नीच्या कौटुंबिक कलहातून संसाराचा गाडा रुळावरून घसरलेला दाम्पत्याना मार्गदर्शन करून त्यांचा संसार पुन्हा रुळावर आणण्याचे काम येथे केले जाते. लवकरच येथे भरोसा केंद्राची उभारणी केली जाणार असल्याची माहिती काळे यांनी दिली.
मोबाइलच्या अतिवापरामुळे नात्यात कटुता येण्याबरोबरच आजारालाही सामोरे जावे लागत आहे.त्यासाठी चांगल्या मनोपसार तज्ञांकडे जाऊन समुपदेशन घेण्याची गरज असल्याचे डॉक्टर माणिक पाटील यांनी सांगितले.
पती पत्नीच नात हे एक विश्वसाच नाते असते. परंतू, या नात्याला मोबाइलच्या अतिवापराची किनार लागली आहे. त्यामुळे प्रेमाने जपलेली नाती सैल होत आहेत. आता मोबाईलचा अतिवापर टाळणे हेच फायद्याचे ठरणार असल्याचे स्वप्निल उमप यांनी सांगितले.