अमरावती - शहरात जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या महाविद्यालयापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरळीत पार पडले आहे. मात्र, शहरातील इतर सर्व भागात रस्त्यांवर खड्डे पडले आहे. त्यामुळे अमरावतीकर त्रस्त आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सांगितल्याप्रमाणे ४ महिन्यात शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण झाली नाही, तर या कार्यकारी अभियंत्यास खड्ड्यात टाकू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज बुधवारी दिला.
शहरात सर्वत्र रस्त्याचे काँक्रिटिकरणाचे काम सुरू आहे. या कामाची गती अतिशय संथ असून ही कामे दर्जाहीन आहेत. त्यामुळे अमरावतीकर त्रस्त झाले आहेत. अनेक भागात रस्ते अर्धवट पडले असून अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट सोडण्यात आले आहे. रस्ता काँक्रिटिकरणाच्या नावाखाली सुरू असणाऱ्या गलथान कारभारामुळे शहरातील अनेक भागात खड्डे पडले आहेत. अनेक रस्ते हे बंद आहेत. हा संपूर्ण त्रास गेल्या दीड-दोन वर्षांपासून अमरावतीकर सहन करत आहेत.
हे वाचलं का? - अमरावतीत ट्रक पलटी होऊन २ जण ठार, तर ८ जण जखमी
सर्व कामे योग्य दर्जाची व्हायला हवी, या मागणीसाठी मनसेचे महानगर अध्यक्ष संतोष भद्रे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेडगे यांच्या दालनात ठिय्या मांडला. शहरात सर्व रस्त्यांची दुर्दशा झाली असताना माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या पोटे महाविद्यालयाला जोडणारा कठोरा मार्गावरील रस्ता हा अतिशय गुळगुळीत कसा काय झाला? अशा स्वरुपाचे सर्वच रस्ते का होत नाही? असा सवाल यावेळी कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. तसेच पोटे यांचे काम तडकाफडकी केले. मात्र, अमरावतीकरांचे हाल का होत आहेत? असाही सवाल त्यांनी यावेळी अभियंत्यांना विचारला.
हे वाचलं का? - काद्यांने केला वांदा...ग्राहकांच्या खिशांना लावली कात्री
शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण कधी होणार? याची लेखी माहिती दिल्याशिवाय आम्ही दालना बाहेर जाणार नाही, असा पवित्रा संतोष भद्रे यांनी घेतला होता. त्यानंतर कार्यकारी अभियंता शेळके यांनी जून 2020 मध्ये शहरातील सर्व रस्त्यांची कामे पूर्ण झालेली असतील, असे लेखी आश्वासन दिले. यावेळी संतोष म्हात्रे यांच्यासह प्रवीण डांगे, गौरव बांधते, शुभम वानखेडे, अखिल शेख, रुद्र तिवारी, संजय विश्वकर्मा, विवेक पवार, अतुल चिखले, अभिजित काळे, चंद्रकांत खांडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.