अमरावती - शहरातील सर्वात मोठ्या स्मशानभूमीत नव्याने आलेल्या तिसऱ्या शवदाहिनीची मनसे आणि भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. विशेष म्हणजे या तोडफोडीत परिसरातील संतप्त महिलाही सहभागी झाल्याने गोंधळाची स्थिती निर्णाण झाली होती.
तिसऱ्या शवदाहिनीला विरोध -
कोरोनामुळे दगावणाऱ्यांवर शहरातील सर्वात मोठ्या हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. त्यामुळे त्याचा धूर आणि स्मशानभूमीतील राख उडून येथील रहिवासी भागात येत आहे. याविरोधात परिसरातील नागरिक तीन महिन्यांपासून तक्रार करत आहे. याविरोधात परिसरातील नागरिकांचा रोष उफाळून आला असताना आता या स्मशानभूमीत तिसरी शवदाहिनी पोचली. याची माहिती मिळताच परिसरातील महिला सकाळी स्मशानभूमीत पोचल्या. तसेच याबाबतची माहिती भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी आणि मनसेचे जिल्हा संघटक पप्पू पाटील यांना मिळताच दोघेही स्मशानभूमीत पोचले.
शवदाहिनीची तोडफोड -
दोन दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी परिसरातील नागरिकांसह स्मशानभूमीसमोर मूक आंदोलन केले होते. आज स्मशानभूमीत तिसरी शवदाहिनी येताच परिसरातील महिला चिडल्या होत्या. स्मशानभूमीत गोंधळ सुरू असताना या प्रभागातील भाजपचे चारही नगरसेवक पोचले. तसेच मनसे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने स्मशानभूमीत पोचले. स्मशानभूमीत नव्याने आलेली शवदाहिनी मनसे आणि भाजप कार्यकर्त्यानी खाली फेकली. यानंतर नवीन शवदाहिनी साहित्याचीदेखील तोडफाड करण्यात आली. काही साहित्य लगतच्या नाल्यात फेकण्याचा प्रयत्नही या आंदोलकांकडून करण्यात आला.
पोलिसांनी घेतली बघ्याची भूमिका -
स्मशानभूमीत हा सगळा गोंधळ सुरू असताना तैनात राजापेठ पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. पोलिसांसमोर तोडफोड सुरू असताना पोलिसांनी कोणालाही हटकले नाही.
जिल्हाधिकाऱ्यांनी भेट नाकारली -
तोडफोड झाल्याने तहसीलदार कावरे स्मशानभूमीत पोचले. यावेळी भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी आणि मनसेच्या पप्पू पाटील यांनी त्यांना या भागातील नागरिकांचा विरोध असताना याठिकाणी शवदाहिनी आणणे ही चूक असल्याचे सांगितले. यानंतर शिवराय कुळकर्णी यांनी काही महिलांना जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला जाण्याचा सल्ला दिला. जिल्हाधिकाऱ्यांना स्मशानभूमीत तोडफोड झाल्याचे कळताच अशा तोडफोड करणाऱ्यांना मी भेटणार नाही, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी तहसीलदार कावरे यांच्या माध्यमातून कळविले.
पोलीस उपायुक्त येताच परिस्थिती नियंत्रणात -
स्मशानभूमीतील राड्याची महिती मिळताच पोलीस उपायुक्त शशिकांत सातव स्मशानभूमीत पोचले. त्यांनी हातात काठी घेऊन गर्दी करणाऱ्यांना खडसावले. कोरोनाकाळात गर्दी करू नये, यासाठी लागू असणाऱ्या कलमांची जाणीव करून देत पोलीस उपयुक्तांनी शिवराय कुळकर्णी यांना चांगलेच खडसावले. नागरिकांचा प्रश्न सोडवायचा, तर चार जण महापालिका आयुक्तांना भेटा. मात्र, ते न करता अशी तोडफोड करायला लावणे योग्य नसल्याचेही पोलीस आयुक्तांनी शिवराय कुळकर्णी यांना सुनावले.
40 जणांवर गुन्हा दाखल -
राजापेठ पोलिसांनी शवदाहिनीची तोडफोड करून स्मशानभूमीत राडा घालणाऱ्या एकूण 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महापालिकेचे अधिकारीही पोचले -
या घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे उपायुक्त पाटील, शहर अभियंता पवार आणि आरोग्य अधिकारी सीमा नेताम हे स्मशानभूमीत पोचले. स्मशानभूमीत तिसरी शवदाहिनी लावण्याची परवानगी महापालिकेने दिली की नाही हे त्यांना सांगता आले नाही. दरम्यान, पोलीस आयुक्त सातव यांनी महापालिका आयुक्तांशी चर्चा करा. योग्य निर्णय घ्या आणि नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या असा सल्ला देत पोलिसांना मधात पाडू नका अशी विनंतीही केली.
हेही वाचा - 'ईटीव्ही भारत' इम्पॅक्ट - एसटीच्या १३०० सुरक्षा रक्षकांना मिळणार थकीत वेतन