अमरावती - 'जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी आमदार म्हणून मी विधानसभेत मुद्दा मांडला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 6 मार्चला अर्थसंकल्पीय भाषणात अमरावतीत 2021-2022 मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय सांगितला. त्याअगोदर शासन स्तरावर अमरावतीच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी विशेष प्रयत्न झाले नाही. भाजपाच्या काही मंडळींनी यासाठी निश्चित आवाज उठवला मात्र, त्यांना यश आले नाही. तेच भाजपा नेते आता मात्र वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुद्द्यावरून खोटे बोलत आहेत. त्यांनी गैरसमज पसरवू नयेत,' अशी विनंती आमदार सुलभा खोडके यांनी केली आहे. सोबतच अमरावतीत वैद्यकीय महाविद्यालय होणारचं असेही ठणकावले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समिती केले होते आरोप -
अमरावती शहरात मंजूर झालेले वैद्यकीय महाविद्यालय महाविकास आघाडी सरकारने सिंधुदुर्ग येथे पळवले. यात आमदार काहीही करू शकले नाहीत, असा आरोप शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीने केला होता. या आरोपात तथ्य नसल्याचे अमरावतीकरांना कळावे यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह आमदार सुलभा खोडके यांनी पत्रकार परिषद घेतली. माजी खासदार अनंत गुढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खोडके, काँग्रेसचे शहर अध्यक्ष बबलू शेखावत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजेंद्र महल्ले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे हे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
किरण पातूरकर यांनी पदासाठी घेतला पुढाकार -
भाजपाचे विद्यमान शहर अध्यक्ष किरण पातूरकर यांनी 2016 पासून वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू केले हे आम्हला मान्य आहे. ते माझे चांगले मित्र देखील आहेत. देवेंद्र फडणवीसांना त्यांनी आमच्यामोर वैद्यकीय महाविद्यालयासाठी निवेदन सादर केले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी निवेदनाची साधी दाखलही घेतली नाही. शासकीय वैद्याकीय महाविद्यालयासाठी प्रयत्न केल्याने किरण पातूरकर यांना मात्र, शहर अध्यक्षपद मिळाले, असा आरोप माजी खासदार अनंत गुढे यांनी केला.
भाजपात तीन डॉक्टर, एकानेही घेतला नाही पुढाकार -
देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत जवळचे असणारे डॉ. अनिल बोंडे यांच्यासह डॉ. रणजित पाटील आणि डॉ. सुनील देशमूख ही मंडळी जिल्ह्यात आहेत. यांच्यापैकी एकानेही वैद्यकीय महाविद्यलयासाठी प्रयत्न केले नाही, असे संजय खोडके म्हणाले.
राजकीय नव्हे विकासाची भूमिका ठेवा -
अमरावतीत यापूर्वी शासकीय महाविद्यालयासाठी जे काही सोपस्कार पार पडले त्यात काहीही अर्थ नव्हता. किरण पातूरकर यांच्यामुळे हा विषय निश्चित समोर आला मात्र, शासकीय पटलावर याची दाखल आता घेण्यात आली. आपण सर्वांनी राजकीय भूमिका बाजूला ठेऊन विकासाची भूमिका ठेवावी, असे आवाहन आमदार सुलभा खोडके यांनी केले.