अमरावती- गेल्या सहा महिन्यांपासून रेंगाळत पडलेल्या राजपेठ उड्डाणपुलाचे काम उद्यापासून योग्य पद्धतीने सुरू झाले पाहिजे, अन्यथा तुम्ही जिथे दिसाल त्याच ठिकाणी मार खाल, अशी धमकीच आमदार रवी राणा यांनी संबंधित कंत्राटदारास दिली आहे. महापालिका आयुक्तांनी संबंधित कंत्रादारास समजून सांगावे, असेही आमदार राणा यांनी म्हटले आहे.
राजपेठ येथून बडनेरा आणि दस्तुर नगरच्या दिशेने उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. बदनेरच्या दिशेने उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन हा मार्ग सात ते आठ महिन्यांपासून वाहतुकीस खुला झाला आहे. दस्तुरनागरकडे जाणाऱ्या मार्गावर रेल्वेरुळावरून उड्डाणपूल बांधण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. रेल्वे प्रशासन त्यांच्या परीने काम करित असताना या उड्डाणपुलाच्या कामाचे कंत्राट घेतलेले नागपूरचे कंत्राटदार आशिष चाफेकर यांनी रेल्वेलाईनपर्यंत दस्तुर नगर आणि राजपेठ या दोन्ही दिशेचे काम थांबविले आहे. त्यामुळे रेल्वेरुळाच्या पलीकडील सुमारे दोन लाख नागरिकांना या फिरून शहरात, शाळेत, कार्यालयात जावे लागत आहे.
आज आमदार रवी राणा यांनी महापालिका आयुक्त संजय निपाणे यांच्यासह राजपेठ रेल्वे क्रॉसिंग येथील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी रेल्वेच्या हद्दीतील काम वगळता कामंत्राटदार आशिष चाफेकर यांनीही आपले काम अर्धवट सोडून बंद ठेवल्याचे निदर्शनास आले. परिसरातील नागरिकांनी यावेळी आमदार राणा यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला. आमदार राणा यांनी आशिष चाफेकर यांना काम का बंद आहे, किती मजूर कामावर आहेत असे विचारले असता ४० मजूर कामावर आहेत आणि लोकसभा निवडणुकीसाठी ते गावी गेले असून अद्याप परत आले नाही, असे हास्यास्पद उत्तर देताच आमदार राणा भडकले.
निवडणूक होऊन एक महिना झाला. घर बांधायला चाळीस मजूर येतात. या कामावर चारशे मजूर हवेत. तुमच्या कानाखाली वाजवायला हवे असे तुम्ही उत्तर देत आहात. मी शासनाकडून निधी आणून दिला. रेल्वेची परवानगी आणून दिली आणि तुम्ही फालतू कारणे सांगता. मला उद्यापासून काम सुरू झालेले दिसले नाही तर मी तुम्ही दिसले तिथे मारणे सुरू करेल. नागपूरच नव्हे तर महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला काम मिळू देणार नाही, असा इशारा आमदार राणा यांनी आशिष चाफेकर यांना दिला.