अमरावती - अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असताना सरकारकडून तोकडी मदत देण्यात आली. मात्र, शेतकऱ्यांना ५० रुपये हेक्टरी मदत मिळायला हवी आणि लॉकडाऊन काळातील वीजबिले माफ करावी या मागणीसाठी बडनेराचे आमदार रवी राणा गुरुकुंज मोझरी येथे अमरावती नागपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांनी आमदार रवी राणा आणि सुमारे १०० कार्यकर्त्यांना आंदोलनस्थळावरून ताब्यात घेतले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौज फाटाही तैनात केला होता.
दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा-
शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळावी व लॉकडाऊन काळात आलेली वीज माफ करण्यात यावे, यासाठी आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे या महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी रवी राणा यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेत हे आंदोलन मोडीत काढले.
आंदोलनाला हिंसक वळण-
रवी राणा ताब्यात घेतल्यानंतर आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि महामार्गावरच टायरची जाळपोळ केली, त्यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले. रवी राणा यांना ताब्यात घेताना राणा म्हणाले, की यावेळी शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात आहे, त्यामुळे मी सुद्धा जेल मध्ये राहून काळी दिवाळी साजरी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.