अमरावती : आमदार बच्चू कडू यांनी माजी मंत्री यशोमती ठाकूर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या गटातील तीन संचालकांच्या भरवशावर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आपली सत्ता स्थापन केली. अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर आमदार बच्चू कडू यांच्या कार्यकारिणी मंडळाची पहिलीच बैठक मात्र फसली आहे. बबलू देशमुख गटाचे तेराही संचालक पुन्हा एकत्र आले. त्यामुळे शुक्रवारी पार पडलेल्या या बैठकीला 13 संचालक अनुपस्थित राहिले. त्यामुळे अल्पमतातील या कार्यकारिणीला अखेर बैठक स्थगित करावी लागली.
कार्यकारी मंडळ अल्पमतात : गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा मध्यवर्ती बँकेवर काँग्रेसचे वर्चस्व होते. यावेळी मात्र आमदार बच्चू कडू यांनी बबलू देशमुख गटाच्या तीन संचालकांना फोडले. बच्चू कडू यांनी बँकेवर बळजबरीने आपली सत्ता प्रस्थापित केली, असा दावा बबलू देशमुख यांनी केला आहे. परंतु, या सत्ताकारणानंतर मात्र त्या तीन संचालकांना आपली चूक कळल्यानंतर ते पुन्हा बबलू देशमुख गटात सहभागी झाले, त्यामुळे बहुमत बबलू देशमुख गटाकडे असल्याने तेराही संचालक शुक्रवारच्या बैठकीला अनुपस्थित राहिले. अध्यक्ष झाल्यानंतर आमदार बच्चू कडू यांची पहिलीच कार्यकारिणी मंडळाची ही बैठक अयशस्वी झाली. अखेरीस अल्प मतातील या कार्यकारिणी मंडळाला ही बैठक स्थगित करावी लागली.
बहुमत पुन्हा आमच्याकडे : दरम्यान या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बँकेचे माजी अध्यक्ष आणि कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी काँग्रेसने शेतकरी हितासाठी आणि बँकेच्या विकासासाठी केलेल्या कामाचा पाढा वाचला. आम्ही केलेल्या लोकोपयोगी कामांमुळेच शेतकऱ्यांनी विश्वासाने या बँकेवर आपल्या गटाकडे सत्ता सोपविल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे. आमदार बच्चू कडू यांनी राजकारण करत केवळ पैशांच्या जोरावर या बँकेवर सत्ता स्थापित केली होती. मात्र त्यांचा शेतकरीविरोधी एकही मनसुबा आम्ही पूर्ण होऊ देणार नाही असे सांगत बँकेचे तेराही संचालकांच्या रुपाने बहुमत आपल्याकडे असल्याची आठवण त्यांनी करून दिली. याच बहुमताच्या जोरावर वर्षानुवर्षे बँकेवर आपली सत्ता राहील, असाही दावा बच्चू कडू यांना भविष्यात अधिक धक्का देण्याचा मनसुबा बाळगणाऱ्या बबलू देशमुख यांनी दिला.
हेही वाचा :
- Bacchu Kadu Warning Tendulkar : ऑनलाईन गेमची जाहिरात करुन सचिन तू चुकलास, जाहिरात करणे थांबवावे; अन्यथा... - बच्चू कडूंचा इशारा
- Jan Elgar Morcha : जन एल्गार मोर्चातून बच्चू कडूंचा सरकारला अल्टिमेटम; मागण्या पूर्ण करा अन्यथा....
- Prahar Jan Shakti Party : प्रहार जनशक्ती पक्षाची अमरावती लोकसभा मतदारसंघावर नजर