अमरावती - ग्रामपंचायत निवडणुका संपल्या असल्या तरी सरपंच होणे अद्यापही बाकी आहे. त्यामुळे तुम्हाला काय ते पळवापळवी करायची आहे, ते करून टाका आणि एकदाच सरपंचाची निवड करून टाका, असा गमतीशीर सल्ला राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी नवनिर्वाचीच ग्रामपंचायत सदस्यांना दिला आहे. तिवसा येथील पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना त्यांनी हा मिश्कील सल्ला त्यांनी दिला आहे. मंत्री यशोमती ठाकूर यांच्या या सल्ल्या नंतर कार्यक्रम स्थळी एकच हशा पिकला होता.
तिवसा पंचायत समितीची सुसज्ज इमारत उभी राहिली आहे. जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी येथून व्हावी. जिल्ह्यात इतर ठिकाणी सुरू असलेली पायाभूत सुविधांची कामेही गतीने पूर्ण होतील. जनसामान्यांच्या प्रगतीतूनच विकासाची नवी शिखरे गाठणे शक्य होत असते. हे लक्षात घेऊन प्रशासनाने काम करावे, असे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले.
उदघाटनाचा हा क्षण संस्मरणीय -
अद्ययावत आणि सुसज्ज इमारत उभी राहिली आहे. प्रशासनाकडून जनसामान्यांची कामे आता गतीने पूर्ण व्हावीत. विकासात कधीही राजकारण अडसर बनू नये, याची दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे. सामान्यांच्या प्रगतीतूनच विकासाची नवी शिखरे गाठणे शक्य होत असते. याची जाणीव प्रशासनाने ठेवावी. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी एकमेकांशी ताळमेळ ठेवत काम केले तर निश्चितच गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार व गतीने काम होते. गुरुकुंज मोझरी विकास आराखडा , संत गाडगेबाबा निर्वाणभूमी विकास आराखडा अशी अनेक कामे आपण पाठपुराव्याने पूर्ण केली. महिला भगिनींच्या हाताला बळ देणारी योजना लवकरच हाती घेणार असल्याचेही मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले.