अमरावती - जिल्ह्यासाठी मंजूर असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे सिंधुदुर्गला हलवले, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. यात भाजपसह बीएसपीने देखील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यामुद्द्यावरून आता अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुद्द्यावर राजकारण होत असून विरोधकांनी मागच्या पाच वर्षात काय केले? याचा हिशोब द्यावा असा घणाघात त्यांनी केला.
सिंधुदुर्गला वैद्यकीय महाविद्यालय हलवण्याच्या आरोपावर बोलताना ठाकूर म्हणाल्या की, सिंधुदुर्गला वैद्यकीय महाविद्यालय हलवले नाही. कोरोनामूळे ही प्रक्रिया रखडली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत महाविद्यालयाबाबत बैठक झाली आहे. त्यामुळे रेंगाळलेल्या गोष्टी लवकरच पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त करत यशोमती ठाकूर यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
काय म्हणाले होते भाजप नेते डॉ अनिल बोंडे-
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले होते. त्याप्रमाणे ते प्राधान्य क्रमाने घेण्यात आले होते. आपण पालकमंत्री असताना या महाविद्यालयासाठी दोन जागा सूचवल्या होत्या. त्यापैकी एक जागा ही निश्चितदेखील केली होती, असे डॉ. बोंडे म्हणाले. त्यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे तसा प्रस्तावदेखील पाठवला होता.
अमरावती ऐवजी सिंधुदुर्ग आणि अलिबागला प्राधान्य-
दुर्दैवाने हे महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर प्राधान्य क्रम बदलण्यात आला आहे. त्यामुळे अमरावतीऐवजी अलिबाग आणि सिंधुदुर्ग येथे प्राधान्यक्रम देण्यात आला, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे विदर्भावर विशेषतः पश्चिम विदर्भावर जिथे रुग्ण संख्या जास्त आहे, तिथे महाविकास आघाडीने अन्याय केल्याचे ते म्हणाले होते.