अमरावती - औषधांची परिणामकारकता एका मर्यादेनंतर संपते, तशीच काँग्रेसची गत झाली आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर औषधांसारखीच काँग्रेसचीही 'एक्सपायरी डेट' संपली, असा हल्लाबोल राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अमरावतीत केला.
शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड अभियानासंदर्भात माहिती घेण्यासाठी आज सुधीर मुनगंटीवार अमरावतीत आले होते. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
आज देशातील 17 राज्यांमध्ये भाजपला 50 टक्क्यांच्यावर मते मिळाली आहेत. 20 राज्यात तर काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या. आज काँग्रेसची विचारसरणी बदलली आहे. 'दारू हटाव' म्हणणारी काँग्रेस 'दारूबंदी हटवा' म्हणत आहे. त्यामुळे आज काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा उभारी घेईल, असे वाटत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील जे लोकप्रतिनिधी, नेते चांगली कामे करतात, अशांना भाजप-शिवसेना या मित्र पक्षात घेऊन राज्याच्या विकासाच्या गतीत त्यांच्या व्यवहारीक कुशलतेचा लाभ आम्ही घेऊ. मात्र, ज्यांनी 47 वर्षे सत्ता उपभोगली आणि वाईट कामे केलीत अशांना आम्ही कदापी सोबत घेणार नसल्याचेही मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केले.