अमरावती - कृषी कायद्याविरोधात पंजाब, राजस्थान हरयाणासह संपूर्ण देशभरात आंदोलन सुरू आहे. ठिकठिकाणी शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो कार्यकर्ते व शेतकऱ्यांसोबत राज्यमंत्री बच्चू कडू आज दिल्लीकडे दुचाकीने रवाना होणार आहेत.
तत्पूर्वी राज्यमंत्री बच्चू कडू हे अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीला अभिवादन करून या आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या या आंदोलनावेळी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शेकडो पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुपारी १ वाजताच्या सुमारास या आंदोलनाला सुरुवात होणार असून त्यासाठी आता कार्यकर्त्यांची फौज मोझरीत दाखल होऊ लागली आहे.
![farmer protest in amravati](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-am-01-amravati-10016_04122020115141_0412f_1607062901_1103.jpg)
दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काही दिवसांपासून आक्रमक पवित्रा घेतला आहे. तीन तारखेपर्यंत दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा तोडगा न निघाल्यास दुचाकीने हजारो कार्यकर्ते बैतुल मार्गांवर जातील असे कडू म्हटले होते. तसेच त्यांच्यासोबत स्वत: जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. आता तीन तारीख उलटून देखील शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने अखेर आज बच्चू कडू यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
![farmer protest in amravati](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-am-01-amravati-10016_04122020115141_0412f_1607062901_794.jpg)
यापूर्वी पंतप्रधान मोदींच्या वडतनगर येथे आंदोलन
बच्चू कडू हे नेहमीच त्यांच्या आगळ्यावेगळ्या आंदोलनामुळे चर्चेत असतात. यापूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन केले. तीन वर्षांपूर्वी बच्चू कडू यांनी 'गनिमी कावा' करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडतनगर येथे जाऊन आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान कडू यांना रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला होता. परंतु पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बच्चू कडू हे वडतनगरमध्ये पोहोचले होते. दरम्यान आता या आंदोलनातही बच्चू कडू दिल्लीत जाऊन कशा पद्धतीने डेरा देतात, हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
![farmer protest in amravati](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-am-01-amravati-10016_04122020115141_0412f_1607062901_463.jpg)