अमरावती - सातत्याने केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी मात्र केंद्र सरकारच्या ‘किसान रेल’ योजनेचे कौतुक केले आहे.
एक किसान रेल सुरू झाली, त्याचप्रमाणे राज्याच्या इतर भागातूनही अशी किसान रेल सुरू करण्याची मागणीही मंत्री कडू यांनी केली.
शेतकऱ्यांच्या शेतमालाची राज्य व राज्याबाहेर विक्री करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टीने मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने देशातील पहिली किसान रेल्वे दोन दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र ते बिहार राज्यापर्यंत रेल्वे सुरू झाली आहे.
नाशिकमधून सुरू झालेल्या या किसान रेल्वेने शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक सोपी होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले आहे. सातत्याने केंद्र सरकारवर टीका करणारे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले.
किसान रेल्वे ही चांगली संकल्पना आहे. याचा किमान दहा टक्के तरी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार मानतो. सोबतच मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागांतूनही एक-एक किसान रेल्वे सरकारने सुरू करावी. प्रत्येक भागातून अशी रेल्वे सुरू झाल्यास देशांतर्गत बाजारपेठ शेतकऱ्यांना मिळेल. यातून डाळ आयात करू नये, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल, असे मंत्री बच्चू कडू म्हणाले.