अमरावती - निसर्ग सौंदर्य सृष्टीने नटलेल्या मेळघाटमध्ये बेरोजगारी आणि स्थलांतर या गंभीर समस्या बनत चालल्या होत्या. परंतु प्रशासनाने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मेळघाटमधील आदिवासी बांधवांमध्ये कमालीचे बदल घडले आहेत. त्यामुळे स्थलांतर आणि बेरोजगारीमध्ये काही प्रमाणात आळा बसला आहे. अमरावती नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये मेळघाटच्या रोजगार हमी कामाचा डंका वाजला आहे.
रोजगाराची वणवण थांबली -
मेळघाटच्या पहाडी आणि उंच दऱ्याखोऱ्यांमध्ये काम करणारे मजूर रोजगार हमी योजनेतील आहे. शासनाच्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मेळघाटातील हजारो मजुरांच्या हाताला आता काम आले आहे. त्यामुळे त्यांची रोजगारासाठीची वणवण थांबली आहे. त्यामुळे कुटुंब चालवायला हातभार लागत आहे. महाराष्ट्रामध्ये मागील काही वर्षांपासून रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली आहे. या रोजगार हमीच्या माध्यमातून मेळघाटामध्ये ही कामे केल्या जात आहे. यामध्ये आदिवासी महिला व पुरुषांच्या हाताला काम मिळाले असून हक्काची रोजीरोटी त्यांच्यासाठी तयार झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून मेळघाटमध्ये दरवर्षी 37 लाख मनुष्यकामाची निर्मिती केली जाते. तर दरवर्षी जवळपास 30 हजार मजूर काम करत असतात.
स्थलांतर थांबले -
मेळघाटमध्ये गेल्या अनेक वर्षापासून रोजगाराची वानवा होती. त्यामुळे वर्षभरातील काही महिने येथील आदिवासी बांधव हे स्थलांतर करून दुसऱ्या ठिकाणी कामाच्या शोधासाठी जात होते. तिथे गेल्यानंतर त्यांना पुरेसा पैसाही मिळत नव्हता. परंतु सरकारच्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून त्यांना आपल्या गावी मजुरी मिळत असल्याने समाधान व्यक्त केला. योजनेच्या माध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाला आहे. या योजनेची व्याप्ती सरकारने आणखी वाढवल्यास मेळघाटमधील रोजगाराची वानवा संपुष्टात येण्यासाठी वेळ लागणार नाही.
जलसंवर्धनाची कामे -
रोजगार हमीच्या माध्यमातून मेळघाटामध्ये तलाव खोलीकरण, तलावातील गाळ काढणे, पहाडावरील पाणी मुरवण्यासाठी बांध घालणे अशाप्रकारचे अनेक मेळघाटात होताना दिसत आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये अनेक हातांचे काम गेले. परंतु मेळघाटमध्ये मात्र आदिवासी बांधवांना हक्काचा रोजगार या रोजगार हमीच्या माध्यमातून मिळाला आहे. दरम्यान राज्यात मेळघाट बरोबरच अमरावती जिल्हा देखील रोजगार हमी योजनेमध्ये अव्वल असल्याची माहिती रोजगार हमीचे उपजिल्हाधिकारी राम लंके यांनी दिली. जवळपास 62 लाख मनुष्यबळ निर्मिती उपलब्ध करून दिल्याचे राम लंके यांनी म्हटले आहे. आगामी काळातही अशाचप्रकारे भरपूर कामे अमरावती जिल्ह्यामध्ये केले जाईल, असा विश्वास देखील त्यांनी वर्तविला आहे.