अमरावती Melghat Animals News : अमरावती शहरालगतच्या जंगल परिसरासह चांदुर रेल्वे, वरुड, मोर्शी या भागात असणाऱ्या घनदाट जंगल परिसरातील शेत शिवारांमधील विहिरीत वन्य प्राणी पडत असल्याच्या घटनेत गत काही वर्षांपासून वाढ झालीय. 8 जानेवारीला वरुड तालुक्यातील एका शेतात माकडाची शिकार केल्यावर बिबट शेतात जमिनीशी समांतर असणाऱ्या विहिरीत कोसळला. वनविभागाच्या रेस्क्यू पथकानं त्याला अथक प्रयत्नानं बाहेर काढलं. तसंच अमरावती नागपूर एक्सप्रेस हायवेवर बडनेरालगत एका शेतात कुत्र्याची शिकार करण्याचा प्रयत्न कुत्रा आणि बिबट विहिरीत पडल्याची घटना घडली होती. चांदुर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या रहिमाबाद या गावात पाच वर्षांपूर्वी कठडे नसलेल्या विहिरीत पडल्यामुळं बिबट्याचा मृत्यू झाला होता. बिबट्यासह हरीण, नीलगाय विहिरीत पडण्याच्या घटनेत गत पाच-सहा वर्षात मोठी वाढ झाली आहे.
मेळघाटात कठडे नसलेल्या विहिरींची संख्या अधिक : मेळघाटात चिखलदरा आणि धारणी या दोन्ही तालुक्यात अति दुर्गम भागात वसलेल्या अनेक गावालगतच्या शेतशिवारांमध्ये अगदी जमिनीच्या पातळीवर विहिरी आहेत. त्यामुळं जोपर्यंत आपण विहिरीच्या जवळ जात नाही तोपर्यंत आपल्याला इथं विहीर असल्याचं लक्षात सुद्धा येत नाही. त्यामुळं विहीर जमिनीच्या पातळीपासून थोडी उंच बांधावी, विहिरीला कठडे बांधून त्यावर जाळी टाकावी, यासंदर्भात वनविभाग किंवा इतर प्रशासकीय यंत्रणेद्वारे आदिवासी बांधवांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे.
मेळघाटात विहिरींसाठी योजनाच नाही : शेतात विहिरींसाठी शासनाच्या वतीने अनेक योजना राबविल्या जात असले तरी मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांना याबद्दल काहीच माहित नाही. आमच्यापर्यंत विहिरी संदर्भात कुठलीच योजना आली नसल्यामुळं आम्ही स्वतःच या विहिरी बांधल्या आहे. आम्ही बांधलेली विहीर मातीचीच आहे. कधीकधी या विहिरीत वन्यप्राणी देखील पडतात, अशी माहिती मेळघाटातील टेंब्रू गावातील शहाजी बाबूलाल कासदेकर या शेतकऱ्याने 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
विदर्भात 'वानाडोंगरी पॅटर्न' राबवून शेतातील प्रत्येक विहिरींना कठडे बांधण्याची गरज आहे. या संदर्भात मी राज्य शासनाला पत्र देखील दिलंय- यादव तरटे, माजी सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ
विदर्भात 'वानाडोंगरी पॅटर्न' ची गरज : विदर्भातील वन परिसरात शेत शिवारात कठडे नसलेल्या विहिरींमध्ये वाघ, बिबट, नीलगाय, काळवीट आणि इतर वन्य प्राण्यांच्या मृत्यूच्या घटनेत वाढ होत आहे. भंडारा जिल्ह्यातील वानाडोंगरी परिसरामध्ये 2021 मध्ये तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी धनविजय यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेमधून या भागातील शेतातील विहिरींना कठडे बनवले होते. यामुळं त्या भागात वन्यप्राणी विहिरीत पडून जखमी होणे किंवा दगावण्याच्या घटना बंद झाल्याची माहिती राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य यादव तरटे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
हेही वाचा -