अमरावती : मेळघाटातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणातून येथील स्थलांतराला आळा बसेल असा विश्वास महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने चिखलदरा तालुक्यातील सलोना येथील मेळघाट ग्रामउद्योग केंद्राच्या उद्घाटन व संवाद पर्व कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
स्थलांतराला बसेल आळा
निसर्गाने येथील आदिवासी बांधवाना समृद्ध केले आहे. मात्र आर्थिक विवंचनेतून आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी भटकंती करावी लागते. गावातील महिलांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देऊन त्यांना अर्थबळ देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ काम करत आहे. मेळघाटातील मोहफुल, बांबू, जवस, मध, दूध, जगनी व तेंदूपत्ता प्रक्रीया उद्योगातून महिला आर्थिक सक्षम झाल्यास मेळघाटातील स्थलांतराला आळा बसेल असा विश्वास ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चिखलदरा-धारणी मतदारसंघाचे आमदार राजकुमार पटेल, शिवसेना जिल्हा प्रमुख ज्योती अवघड, माजी सभापती रजनी बेलसरे, माविमचे विभागीय सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी केशव पवार, जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, सिपना लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्ष मानकुबाई तोटे उपस्थित होत्या.
ग्रामोद्योग केंद्राच्या माध्यमातून गावातच रोगजार
पुढे बोलतांना ज्योती ठाकरे म्हणाल्या, महिलांना माविमच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अर्थबळ देण्यात येत आहे. सलोना येथील केंद्रातून महिलांना रोजगारक्षम बनविण्यासाठी मेळघाट ग्रामउद्योग केंद्राच्या माध्यमातून महिलांना तेलघाणी, पापड उद्योग, शेवळा उद्योग उभारणीतून गावातच रोजगार मिळाले आहे. त्यामुळे मोहफुलाचे तेल काढण्यासाठी होणारा पैशांचा व वेळेचा अपव्यय टळला आहे. महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे विविव सकारात्मक योजनांना प्रोत्साहन देत आहेत. तळागाळातील महिलांच्या अडचणी सोडवून त्यांना सक्षम करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माविमच्या माध्यमातून १६ लाख ५० हजार महिलांना सुमारे ४ हजार कोटींच्या कर्जाचे वितरण करण्यात आले. बचत गटांमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे. महिला उद्योगासह सामाजिक व राजकीय क्षेत्रात प्रभाव पाडताना दिसत असून हे चित्र समाधान देणारे आहे असेही ठाकरे म्हणाल्या.
प्रत्येक गावात उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न
आमदार राजकुमार पटेल म्हणाले की, सध्या मेळघाटातील ५० टक्के नागरिक राेजगारासाठी बाहेर गेले आहेत. प्रत्येक गावात उद्योग सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. मानव संसाधनासाठी येणारा संपूर्ण निधी बचत गटांच्या कामासाठी देणार असल्याचे अश्वासन आमदार पटेल यांनी दिले.
एकाच छताखाली पाच उद्योग
सलोना येथील मेळघाट ग्रामउद्योग प्रकल्पातून एकाच छताखाली पाच उद्योग राबविण्यात येत आहेत. तेलघाणी, आटा चक्की, पापड मशीनसह विविध यंत्र बसविण्यात आले आहे. मोहफुलाचे तेल काढण्यासाठी होणारा पैशांचा व वेळेचा होणारा अपव्यय थांबला आहे. यामुळे एका चक्कीवर पाच अशा एकुण ५० महिला आत्मनिर्भर झाल्या आहे. महिलांचा आत्मविश्वास वाढल्याची माहिती गाव विकास समितीच्या अध्यक्षा सुग्रती रामिकसन मेटकर यांनी दिली.
स्थानिक पातळीवर रोजगार देण्याचे प्रयत्न
मेळघाटातील महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण व्हावा याकरिता माविमच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांच्या हस्ते चिखलदरा येथे रमाई ग्रामउद्योग केंद्रांचे भूमीपूजनही करण्यात आले. या उद्योग केंद्रातून हॉटेल व्यावसायिकांना मसाल्याचे पदार्थ, पॉपकॉर्न आदी खाद्य पदार्थांची निर्मिती करण्यात येणार आहेत. यावेळी मोथा येथे उन्नती ग्रामउद्योग केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ज्यातीताई ठाकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.
हेही वाचा - संजय राऊत आज दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भेटीला