अमरावती Leopard Video Amravati : अमरावती शहरातील रहिवासी आणि निसर्गप्रेमी असणारे संजय पालवे (Nature lover Sanjay Palve) हे चार दिवसांपूर्वी पोहरा परिसरातील एका मंदिरात देवदर्शनासाठी गेले असता त्यांना दुरून बिबट दिसला. त्यांचे वाहन बिबटचा दिशेने काहीसे जवळ जातात एक नव्हे तर दोन बिबट असल्याचे त्यांना आढळून आले. नर आणि मादी असणाऱ्या या बिबट्यांचे मिलन झाल्याचे दृश्य पाहून थक्क झालो असे संजय पालवे 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितलं.
नर बिबटला केलं समर्पण : मादी बिबट हिने पिलांना जन्म दिला असल्याचं तिच्या शरीर रचनेवरून स्पष्ट होत होतं. त्यामुळं आपल्या परिसरात बाहेरून आलेल्या बिबट पासून आपल्या बछड्यांना धोका होऊ नये यासाठी त्या मादी बिबटने नर बिबटसमोर समर्पण केलं असावं. वाघ पाहण्यासाठी ताडोबाच्या जंगलात आम्ही अनेकदा गेलो. वाघाचे दर्शन होते. मात्र जंगलात बिबट दिसत नाही. मेळघाटच्या घनदाट जंगलात मोठ्या संख्येने वाघ आणि बिबट आहेत. मात्र मेळघाटात त्यांचे दर्शन घडत नाही. अमरावती शहरालगत असणाऱ्या पोहरा, मालखेड, चिरोडी, वडाळी या जंगल परिसरात बिबटचे सातत्याने दर्शन लोकांना होत आहे. मला प्रत्यक्षात एक नव्हे तर नर आणि मादा असे दोन्ही बिबट एकाच वेळी पाहायला मिळाले, असं देखील संजय पालवे यांनी सांगितलं.
डिसेंबर ते मार्च असतो खास विणीचा काळ : बिबट्यांचे मिलन हे वर्षभरात कधीही होते. मात्र डिसेंबर ते मार्च हा चार महिन्याचा काळ हा बिबट्यांचा खास आवडीचा विणीचा काळ असतो. गर्भधारणेनंतर मादी बिबट ही 90 ते 95 दिवसानंतर एकाच वेळी तीन ते चार पिलांना जन्म देते, अशी माहिती वन्यजीव अभ्यासक यादव तरटे यांनी दिली.
असे होते दुसऱ्या नरापासून बछड्यांचे रक्षण : मादी बिबट आपल्या पिलांना जन्म दिल्यावर त्यांचे सहा महिन्यांपर्यंत एकटीच संगोपन करते. आपल्या पिलांसह बिबट जंगलात सुरक्षित स्थळी वावरत असताना, त्या जंगलात इतर जंगलातील बिबट आला तर त्याच्यापासून पिलांना धोका असतो. अनेक वेळा पिलांना वाचवण्यासाठी मादा बिबट आणि बाहेरून आलेल्या नर बिबट यांच्यात झुंज होते. तर बऱ्याच वेळा मादी बिबट बाहेरून आलेल्या नर बिबटशी मिलन करून त्याला आपलेसे करते. पिलांना जन्म दिल्यावर तीन महिन्यानंतर मादी बिबट ही शारीरिकरित्या मिलनासाठी तयार होत असली तरी, मानसिकरित्या तयार होण्यासाठी तिला सहा महिने लागतात. मात्र पिल्लांसाठी ती जबरदस्ती तयार होते. एकूण तीन ते चार दिवसात 200 वेळा बिबट्यांचे मिलन होते. यानंतर नर बिबट तो जंगल परिसर सोडून दूर निघून जातो, तर कधी जंगलात राहून मादा बिबटच्या पिलांचे रक्षण देखील करतो, अशी माहिती यादव तरटे यांनी दिली.
हेही वाचा -