अमरावती - महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या सालबर्डी येथे प्राचीन शिव गुफा आहे. त्यामुळे गेल्या शेकडो वर्षांपासून येथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. पण, अमरावती जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा महाशिवरात्रीला भरणारी यात्रा रद्द करण्याची मागणी अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शैलेंश नवाल यांनी बैतुल येथील जिल्हाधिकाऱ्याकडे केली होती. ती मागणी मान्य करत कोरोनामुळे यंदा इतिहासात पहिल्यादा ही यात्रा रद्द झाल्याने आज (दि. 11 मार्च) सालबर्डी येथे शुकशुकाट पाहायला मिळाला.
अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी शहरापासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर सालबर्डी हे शंकराचे देवस्थान आहे. सातपुडा पर्वत रांगेत विराजमान असलेल्या या गुफेत दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भक्त येत असतात. त्यातच शिवरात्रीला मोठे महत्व आहे. जे लोक मध्यप्रदेशातील पंचमढी नागद्वार येथे दर्शनाला जातात ते भाविक देखील येथे दर्शनासाठी येतात. महाशिवरात्री महोत्सवात येथे चार ते पाच दिवस मोठी यात्रा भरते. ही येथील मंदीर हे मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यात येते तर यात्रा ही महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यात भरते त्यामुळे येथील यात्रेला दोन्ही राज्यातील भाविक मोठया संख्येने येतात. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पहिल्यांचा ही यात्रा रद्द झाली आहे.
दोन्ही राज्यातील पोलिसांचा बंदोबस्त
सालबर्डी हे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रच्या सिमेवर असल्याने ठिक-ठिकाणी दोन्ही राज्यातील पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मोर्शीवरून सालबर्डी येथे जायचे असल्यास सुरुवातीलाच मोर्शी पोलीस तैनात करण्यात आले आहे. तर मध्यप्रदेश हद्दीत मध्यप्रदेशातील पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
मंदीर सुरू यात्रा रद्द
महाशिवरात्री असल्यामुळे मंदिर हे सुरू ठेवण्यात आले आहे. मात्र, यात्रा रद्द केली असली तरी अनेक भाविक हे पोलिसांना हातावर तुरी देऊन दर्शनासाठी आल्याचे चित्र आज सालबर्डी येथे पाहायला मिळाले. आज प्रभात पटमच्या तहसीलदार यांनीही सालबर्डी येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
श्रावण महिन्यात देखील होते प्रचंड गर्दी
सालबर्डी हे देवस्थान सातपुडा पर्वत रांगेत आणि घनदाट अशा विस्तीर्ण जंगलात वसलेले आहे. श्रावण महिन्यातही येथे भाविक भक्तांची मोठी गर्दी होत असते.
हेही वाचा - कोरोनामुळे मंदिरं बंद; भाविकांनी घेतले प्रवेशद्वाराजवळून महादेवाचे दर्शन
हेही वाचा - अमरावती : जिल्ह्यात आज 554 कोरोनाबाधितांची नोंद