अमरावती - कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फटका जिल्ह्यातील पुसदा गावातील मेंढीपालन व शेळीपालन करणाऱ्या धनगर शेतकऱ्यांना बसला आहे. सध्या संचारबंदीमुळे बाजारपेठा बंद असून शेळ्यांची मागणी होत नसल्याने या लोकांवर आता उपासमारीची वेळ आली आहे.
धनगर समाजातील बहुतांश शेतकरी हे शेळी व मेंढी पालन व्यवसाय करत असतात. त्या व्यवसायातून मिळालेल्या उत्पनातून त्यांचा वर्षभर उदरनिर्वाह चालतो. त्यासाठी ते वर्षभर आपला संसार घेऊन गावोगावी शेतात जाऊन ठिय्या मांडत असतात. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा या तिन्ही ऋतूत ते जीवाची पर्वा न करता शेतात उघड्यावर संसार थाटत असतात. तिथेच शेळ्या, मेंढ्या व कुक्कुट पालन करून ते कुटूंबाचा गाडा हाकतात.
यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने त्यांच्या शेळी, मेंढी व्यवसायाला जबर फटका बसला आहे. सोबतच ज्या शेतकऱ्यांच्या शेतात हे धनगर शेळ्या-मेंढ्या बसवतात त्यांना शेतकऱ्यांकडून पैसे मिळतात. मात्र, यावर्षी शेतकरीसुद्धा हवालदील झाल्याने शेतकऱ्यांनी सुध्दा शेतात शेळ्या-मेंढ्या बसवायला नकार दिला आहे. त्यामुळे, आता या लोकांवर दुहेरी संकट ओढवल्याने उपासमारीची वेळ आली आहे.