अमरावती - कोरोना महामारीतून बचावासाठी लस मिळावी, यासाठी आज शहरातील लसीकरण केंद्रे सुरु करण्यात आली. त्यामुळे अनेक लसीकरण केंद्रावर पहाटे चार वाजल्यापासून नागरिकांची रांग लागली होती. यावेळी सकाळी 11 वाजेपर्यंत लसीकरणासाठी ठराविक कुपन वाटप करण्यात आले. ज्यांना कुपन मिळाले, त्यांना दुपारी लस घेण्यासाठी बोलविण्यात आले.
अशी आहेत केंद्र -
भाजीबाजार परिसरातील महापालिकेचा दवाखाना, नागपुरी गेट परिसरात मुस्लीम सोसायटी असोसिएशन शाळा, मसानगंज परिसरातील महापालिका रुग्णलाय, महेंद्र कॉलनी परिसरात शहरी आरोग्य केंद्र, दंत महाविद्यालय, दस्तुरनगर शहरी आरोग्य केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती महाविद्यालय, दसरा मैदान परिसरातील महापालिलेचा आयसोलेशन दवाखाना आणि बडनेरा येथील महापालिलेच्या मोदी रुग्णालयात आज लस दिली जात आहे.
पहाटे चार वाजता लागली रांग -
बडनेरा येथील मोदी रुग्णालयात पहाटे चार वाजतापासूनच कुपन मिळविण्यासाठी रांग लागली होती. सकाळी 8.30 वाजता कुपन वाटपास सुरुवात झाली. एकूण 200 जणांना या केंद्रावर लस दिल्या जाणार असून दोनशे कुपनसाठी पाचशेच्यावर लोकांची गर्दी झाली. या केंद्रांवर शेवटचे कुपन दुपारी 12 वाजता वितरित करण्यात आले.
आयसोलेश दवाखाण्यात वाद -
दसरा मैदान येथील महापालिकेच्या आयसोलेशन दवाखान्यातही सकाळी 5 वाजल्यापासून गर्दी उसळली होती. या केंद्रावर 60 कुपन वितरित करण्यात येणार आल्याचे जाहीर केल्यानंतर सकाळी 10 वाजता 50 कुपन वाटप झाल्यावर कुपन वाटणे थांबविण्यात आले. यावेळी अनेक नागरिकांनी रुग्णालयात उपस्थित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी वाद घातला. या केंद्रावर ज्या 50 जणांना कुपन वितरित करण्यात आले. त्यांना केंद्रांवर थांबायला सांगून इतरांना मात्र घरी जाण्याची विनंती केली. नागरिकांचा गोंधळ आवरण्यासाठी याठिकाणी पोलिसांना मध्यस्ती करावी लागली.
नागरिकांची पळापळ -
आपल्या घरापासून जवळ असणाऱ्या लसीकरण केंद्रांवर नागरिकांनी पहाटेच धाव घेतली. मात्र, संबंधित केंद्रांवर आपल्याला कुपन मिळणार नाही, हे लक्षात येताच या केंद्रांवरून दुसऱ्या केंद्रांवर नागरिकांनी धावाधाव केली.
केंद्रांवर या आहेत अडचणी -
लसीकरण केंद्रांवर पुरुष आणि महिलांची एकच रांग असल्याबाबत अनेकांनी तक्रार केली. वृद्धांना रांगेत तीन चार तास उभे राहावे लागत आल्याने आमच्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करायला हवी, अशी मागणीही काही वृध्दांनी केली.
हेही वाचा - कोरोनामुळे बदलले गडकरींचे जग, सोशल मीडियाच्या माध्यमातून जनसंपर्क वाढला