अमरावती - 1 डिसेंबरला अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीची चुरस आता वाढायला लागली आहे. एकूण 27 उमेद्वार निवडणूक रिंगणात असून यात अवघे अकरावी आणि बारावी शिकलेले काही उमेदवारही आहेत. हे शिक्षक शैक्षणिक प्रश्न सभागृहात मांडू शकण्यास समर्थ आहेत का? हा मुद्दा सध्या शिक्षक वर्गात चर्चेत आहे. काही तज्ञ शिक्षकांनी या संदर्भात 'ईटीव्ही भारत'शी बोलताना विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
म्हणे गाडगे बाबा पण होते अशिक्षित
अवघे अकरावी आणि बारावी शिकलेले उमेदवार स्वतःची तुलना चक्क संत गाडगेबाबा यांच्याशी करू पाहात आहेत. त्यांच्या शिक्षणाबाबत त्यांना कुणी विचारले तर ते संतापतात. मात्र, कसेबसे राग आवरून संत गाडगेबाबासुद्धा अशिक्षित होते, असा दाखला ते जाब विचारणाऱ्यांना देतात. विशेष म्हणजे, स्वतःची तुलना संत गाडगे बाबा यांच्याशी करणाऱ्या आशा उमेदवारांना संत गाडगे बाबांनी कधी लोकसभा, विधानसभा निवडणूक लढविली नाही, असे प्रत्युत्तरही ऐकावे लागत आहे.
शिक्षक प्रतिनिधी संस्थानिक आणि अशिक्षित नको
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समजतील महत्वाचा घटक म्हणून शिक्षकांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची व्यवस्था केली. शिक्षक मतदारसंघात केवळ शिक्षकांनीच निवडणूक लढवावी, असे अपेक्षित असतना, ज्या शिक्षण संस्थांकडून शिक्षकांवर अन्याय होतो, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हा मतदारसंघ असताना तेथून आता संस्थेचे संचालक निवडणूक लढवीत असल्याने हा शिक्षकांवर अन्याय आहे. शिक्षक मात्र मतदान करताना योग्य निर्णय घेतील. संस्थाचालक आणि अशिक्षित उमेदवारांना शिक्षक थारा देणार नाहीत, असे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रा. दिलीप कडू आणि प्रा. प्रदीप चौतकर म्हणाले.
शिक्षण क्षेत्राचे पावित्र्य जपायला हवे
या निवडणुकीत काही उमेदवार हे व्यावसायिकही आहेत. काहींचे तर शिक्षणही अपूर्ण आहे. असे उमेदवार जर निवडून आले, तर शिक्षण क्षेत्राचे पावित्र्य जपले जाणार नाही. अशिक्षित उमेदवार सभागृहात शिक्षकांचे प्रश्न मांडण्यात असमर्थ ठरणार. शिक्षक मात्र योग्य निर्णय घेतील. आपले प्रश्न सभागृहात मांडणाऱ्या व्यक्तीच्याच पाठीशी शिक्षक उभे राहातील, असा विश्वास भाजपच्या प्रा. मोनिका उमक आणि शिक्षक सेनेचे रुपेश टाले यांनी व्यक्त केला.
उमेदवारांची शैक्षणिक पात्रता
1) श्रीकांत देशपांडे : एम.कॉम, एम.एस डब्ल्यू, एमबीए
2) प्रकाश काळबांडे : एम.कॉम, एम.एड, पीएचडी
3) अविनाश बोर्डे : एम.ए, एम.एड, पीएचडी
4) नितीन धांडे : एमबीबीएस, एमडी
5) अभिजित देशमुख : एम.ए, बीएड
6) संगीता शिंदे : एम.ए बीएड
7) शेखर भोयर : 11 वा वर्ग
8) प्रवीण विधळे : एमएससी, बीएड
9) सुनील पवार : बीएस्सी, बीएड
10) शरद हिंगे : एम.ए बीएड
11) राजकुमार बिनकीवाले : बीएस्सी, बीएड, बीए
12) दिलीप निंभोरकर : बीएस्सी कृषी
13) सतीश काळे : एमएससी एमएड
14) विनोद मेश्राम : बी.ई
15) अरविंद तटे : एम.ए, बीएड, एमफिल
16) महेश डवरे : बी ए. बीएड
17) सैय्यद रिझवान : एमएससी बीएड
18) किरण सरनाईक : बीए
19) अनिल काळे : एम.ए बीएड
20) आलम तन्वीर सैय्यद निजाम अली : बारावी
21) उपेंद्र पाटील : एम.ए बीएड
22) दिपकर टेलगोटे : एम.ए
23) श्रीकृष्ण ठाकरे : एम.ए
24) मुश्ताक अहेमद रेहमान शाह : एम.ए एमएड
25) मोहम्मद शकील : बीएससी, बीएड
26) विकास सावरकर: बीएड
27) निलेश गावंडे : एम.लिब, पीएचडी
हेही वाचा - ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी अमरावतीत समता परिषदेचा मोर्चा