अमरावती - जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड शेतशिवारात बिबट्याने गुराखीवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. रविंद्र शिवदास पवार (३२) असे जखमी गुराखीचे नाव आहे. तरी बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करण्याची मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली होती. मात्र, याकडे वनविभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
प्राथमिक उपचार
पवार हे गुरे चारण्यासाठी मांजरखेड शिवारात गेले होते. मौजा मांजरखेड शेतशिवारात कालव्याजवळून गुरे घेऊन परत येत असतांना पाठीमागून बिबट्याने पवार यांच्यावर हल्ला केला. यानंतर आरडाओरड केल्यामुळे सोबत असणारे काही जण धावून आले व त्यांनी काडी फेकून मारल्याने बिबट पळून गेला. सदर व्यक्तीला उजव्या हाताला व पाठीला मार असून दाताच्या खूना उठल्या आहेत. यानंतर जखमी रविंद्र पवार यांना त्वरीत चांदूर रेल्वे येथील ग्रामिण रूग्णालयात आणून प्राथमिक उपचार करण्यात आले. यावेळी ग्रामीण रूग्णालयात ठाणेदार मगन मेहते, पो.कॉ. महेशप्रसाद, चालक जगदिश राठोड तसेच वनविभागाचे कर्मचारी यांनी भेट देऊन जखमी सोबत चर्चा केली. तरी सदर व्यक्तीला तत्काळ शासकीय मदत देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
अन्यथा वनविभाग कार्यालयात आंदोलन करणार
बिबट्याने यापुर्वी मांजरखेड शेतशिवारात जनावरे फस्त केली होती. आम्ही बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणाी वनविभागाकडे केली होती. मात्र, विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे तत्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अन्यथा आम्ही चांदूर रेल्वेच्या वनविभाग कार्यालयात तीव्र आंदोलन करू, असा इशारा शेतकरी तथा शिवसेना उपतालुकाप्रमुख गजानन बोबडे यांनी दिला.
जखमीला आर्थिक मदत
मांजरखेड कसबा परिसरात बिबट्याने तीन दिवसापूर्वी एका निलगायीची शिकार केली होती. त्याच भागात जनावरे चरायला गेल्यामुळे बिबट्याने गुराख्यावर हल्ला केला असावा. जखमी गुराख्याला डॉक्टरांच्या वैद्यकिय प्रमाणपत्रानुसार औषधोपचारासाठी शासनाची मदत मिळेल. दोन महिण्यापूर्वी या भागातील नागरिकांची बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होती. त्यानुसार वनविभागाने बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले होते. मात्र, या भागात बिबट फिरकला नाही. बिबट हा सतत भटकत असल्याने त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता, असे चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी सांगितले.