अमरावती - आज मोबाईल हेच आपले जीवन झाल्यामुळे पाल्य व पालक यांच्यातील सुसंवाद कमी झाला असून त्यांच्या नात्यातील अंतर वाढले आहे. याचाच दुष्परिणाम आज आपण बघत आहोत. त्यामुळे अँड्रॉईड मोबाईलमधून बाहेर पडून आपल्या कुटुंबासोबत जीवनाचा आनंद घ्या. माझ्यावर अॅसिड हल्ला करणारा तरुण हा मला १० महिन्यांपासून त्रास देत होता. ही गोष्ट मी माझ्या आई-वडिलांना सांगितली असती तर, कदाचित माझ्यावर हा हल्ला झाला नसता. तसेच लोकांनी आपल्या डोक्यात असलेले अॅसिड बाहेर काढले पाहिजे असे, मत 'छपाक गर्ल लक्ष्मी अग्रवाल' हिने व्यक्त केले. अमरावतीत पीआरपोटे पाटील ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन टेकेलाँस २०२० च्या आयोजित कार्यक्रमात ती बोलत होती.
या कार्यक्रमात तिला पाहुणी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी तिने तिच्यावर झालेल्या अॅसिड हल्ल्याची थरारक घटना उपस्थित विद्यार्थ्यांसमोर मांडली. पुढे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लक्ष्मी म्हणाली, आपण जेव्हा आपल्या प्रत्यक्ष जीवनात सावधान व्हाल, तेव्हाच आपल्या जीवनाची खरी पहाट होईल. त्यामुळे मुलींनी सदैव सावध आणि तत्पर राहण्याची गरज आहे.
हेही वाचा - अमरावती शहरातील उच्चशिक्षित तरुणीची सापांशी मैत्री
माझ्यावर हल्ला झाल्यानंतर माझ्या डोक्यात आत्महत्येसारखे भयंकर विचार येत होते. परंतु, प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता मी त्याचा सामना केला. म्हणून आज मी तुमच्या समोर उभी आहे. मी अॅसिड हल्ल्याला बळी पडली असली तरी इतर कुठल्याही स्त्रीला अशा प्रसंगाला बळी पडू देणार नाही, असेही लक्ष्मी म्हणाली. यावेळी तिने थेट विद्यार्थ्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष सवांद देखील साधला. विद्यार्थ्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले असता तिने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत मार्गदर्शनही केले. यावेळी लक्ष्मी अग्रवालचे आगमन होताच तिचा सत्कार पी. आर. पोटे पाटील ग्रुपचे अध्यक्ष माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केला.
हेही वाचा - अमरावतीत विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा